
कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण रवळनाथ मंदिर जवळील गुरववाडी येथील सुभाष उर्फ पिंट्या हनुमंत गायकवाड व समीर सुरेश गायकवाड यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये पिंट्या गायकवाड यांच्या मुलीचे कानातील सोन्याचे झुमके, पत्नीच्या कानातील सोन्याच्या रिंग, आईच्या कानातील सोन्याच्या कुड्या, घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील आईचे व पिंट्या यांचे सुमारे ७० हजार रुपये तर त्यांचा चुलत भाऊ समीर गायकवाड यांच्या घरातून त्यांच्या मुलीची ५ ग्राम सोन्याची चेन व कपाटातील लॉकर मधील रोख रक्कम १ लाख ५८ हजार रुपयांचा समावेश आहे.
खारेपाटण - गुरववाडी येथील पिंट्या गायकवाड, चायनीज व्यावसायिक समीर गायकवाड हे चुलत भावाच्या लग्न सोहळ्याकरिता आपले खारेपाटण येथील घर बंद करून कोल्हापूर येथे सोमवारी सकाळी निघून गेले होते. दरम्यान कोल्हापूर येथून बुधवारी सकाळी १० वाजता खारेपाटण येथे घरी आल्यानंतर घराचे पुढील कुलुप तोडल्याचे त्यांचे लक्षात आले. आत जाऊन बघितले असता घरातील बंद कपाटे फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रक्कम चोरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले.
गायकवाड दोन्ही बंधूंनी खारेपाटण पोलिस ठाणे येथे आपली फिर्याद नोंदवली. खारेपाटण पोलिस स्टेशनचे हवालदार पराग मोहिते व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी यांनी खारेपाटण गायकवाड यांच्या घराची पाहणी केली. यामध्ये घरचा मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा तोडल्याचे व लोखंडी कपाट फोडल्याचे निदर्शनास आले.घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला.
सायंकाळी उशिरा खारेपाटण येथे कणकवली पोलिस ठाणे येथून चोरीचा तपास करण्यासाठी श्वानपथक आणण्यात आले होते. या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी व कणकवली पोले पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी करत आहेत.














