गांधीजींचे तत्वज्ञान - स्वच्छ्ता जीवनाचा मूलाधार

Edited by: मनोज पवार
Published on: March 20, 2025 19:40 PM
views 195  views

रत्नागिरी :  महात्मा गांधींचे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयीचे तत्त्वज्ञान त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांना स्वच्छता ही केवळ शरीर आणि परिसराची स्वच्छता नसून मानसिक व आध्यात्मिक स्वच्छतेशी जोडलेली आहे.  गांधीजींनी शारीरिक स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले. त्यांना असे वाटत होते की प्रत्येकाने स्वतःच्या शरीराची व वस्त्रांची स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यांनी दररोज स्नान, दात स्वच्छ करणे, स्वच्छ कपडे परिधान करणे आणि केस व नखे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला. त्यांनी नैसर्गिक व आरोग्यदायी जीवनशैलीचा पुरस्कार केला आणि सेंद्रिय आहारावर भर दिला. त्यांनी नियमितपणे शरीरशुद्धी (उपास, निर्जळी उपवास) करण्याची सवय लावली.

सार्वजनिक स्वच्छते विषयी गांधीजी मानत कि स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यांनी स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांची चळवळ उभारली आणि स्वच्छतागृहांची साफसफाई स्वतः केली. अस्पृश्यता आणि अस्वच्छता यांचा संबंध त्यांनी मांडला आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे ही कोणत्याही जातीच्या व्यक्तीने करू शकते, असे ते म्हणत. त्यांनी खेड्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आणि लोकांना आरोग्यविषयक शिक्षण दिले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, गटारे स्वच्छ ठेवावी, पाणी दूषित करू नये यावर त्यांनी भर दिला.

गांधीजींच्या या तत्त्वज्ञानावरूनच पुढे "स्वच्छ भारत अभियान" ची प्रेरणा मिळाली.त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आणि भारतात अनेक स्वच्छता मोहिमा राबवल्या. त्यांच्या मते, “स्वराज्याच्या आधी स्वच्छता आवश्यक आहे” आणि “स्वच्छता हीच खरी सेवा” हे महत्त्वाचे संदेश होते.

गांधीजींच्या दृष्टीने स्वच्छता ही केवळ शरीर व परिसराची नसून विचार, आत्मा आणि समाज यांचीही असली पाहिजे. त्यांच्या या तत्त्वज्ञानावरच आजच्या आधुनिक स्वच्छता मोहिमा आधारलेल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या अस्थींचा काही भाग चिपळूण येथे जतन करण्यामागे ऐतिहासिक आणि भावनिक कारणे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांचा मोठा वाटा होता आणि त्यांच्या विचारांचा प्रसार संपूर्ण देशभर झाला. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गांधीजींच्या अस्थींची प्रतिष्ठापना करण्यात आली, आणि चिपळूण हे त्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

चिपळूणमधील गांधीजींच्या अस्थींचे महत्त्व 

1. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक – गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या अस्थींचा काही भाग वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित किंवा जतन करण्यात आला.

2. लोकांमध्ये प्रेरणा जागृत करणे – गांधीजींचे विचार आणि तत्त्वज्ञान भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावे, हा यामागील उद्देश होता.

3. चिपळूणचा ऐतिहासिक वारसा – चिपळूण हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या काही नेत्यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. 

 महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सत्य आणि अहिंसा – गांधीजींना वाटायचं की कोणतीही समस्या मारामारीने नव्हे, तर शांततेच्या मार्गाने सोडवावी. स्वावलंबन आणि ग्रामस्वराज्य – लोकांनी स्वतःच्या मेहनतीवर जगायला शिकावे आणि गावांनी स्वतःच्या गरजा पूर्ण कराव्यात. सरळ आणि साधे जीवन – फाजील दिखावा न करता साधेपणाने आणि प्रामाणिकपणे जगावे.स्वदेशी चळवळ – आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू वापराव्यात, यामुळे देश आत्मनिर्भर बनेल.सर्वधर्म समभाव – कोणताही धर्म मोठा किंवा लहान नाही, सर्व धर्म समान आहेत. श्रमाची प्रतिष्ठा – कोणतेही काम लहान-मोठे नसते. प्रत्येकाने मेहनत करून कमावलेले अधिक मूल्यवान असते. चिपळूण गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक स्वर्गीय तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मरणार्थ गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांचे तत्त्वज्ञान मध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी आज त्यांचे सर्व कुटुंब प्रयत्नशील आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे गांधीजींशी संबंधित स्मारक ठेवण्याचा मानस होता.चिपळूणमधील गांधी तीर्थ किंवा गांधी स्मृती स्थळ हे लोकांना गांधीजींच्या विचारांची आठवण करून देणारे एक प्रेरणास्थान आहे.

गांधीजींचे तत्त्वज्ञान घरोघरी पोहोचावे आणि ग्रामीण जीवन सुधारावे यासाठी गांधीजींचे वर्ध्याचे सेवाग्राम, साबरमती आश्रम त्याचबरोबर गांधी तीर्थ जळगाव यासारख्या अनेक सेवाभावी संस्था अविरतपणे कार्य करत आहेत. या सर्व सेवाभावी संस्थांच्या कार्याने प्रभावित होऊन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने गांधींजींचे स्वच्छतेविषयक तत्त्वज्ञान घरोघरी पोहोचावे म्हणून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अविरतपणे काम करून जवळजवळ विविध प्रकारचे 100 उपक्रम प्रत्यक्ष राबवून स्वच्छतेचे महत्व सावर्डे परिसरातील 40 गावांमध्ये पोहोचवण्याचे अत्यंत प्रभावी काम केलेले आहे यामध्ये विद्यालयातील 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.