
सिंधुदुर्गनगरी : पोलीस, आरटीओ, महसूल यांच्या चक्रव्ह्युवात अनेक वाहनचालक व व्यावसायिक अडकून पडत आहेत. या अधिकाऱ्यांकडून ३१ मार्च अखेर पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जबर दंड वसुली सुरू झाली आहे. त्याचा फार मोठा फटका व्यावसायिकांना बसत आहे. नियमावर बोट ठेवत सिंधुदुर्गातील आरटीओ अधिकारी गोव्यातील वाहनचालकांवर कठोर कारवाई करतानाची उदाहरणे समोर येऊ लागली आहे. त्यामुळे गोव्यातील वाहनचालकांमध्ये कमालीची नाराजी उमटली आहे.
मंगळवारी GA 01 P 6373 हा डंपर सिंधुदुर्गातून अडीच ब्रास वाळूचा वाहतूक पास घेऊन गोव्याकडे जात होता. सिंधुदुर्गातील भरारी पथकाच्या आरटीओ नी हा डंपर अडवून त्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली. मार्च एंड असल्यामुळे टारगेट पूर्ण करण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचे त्या डंपर चालकाला त्यांनी सांगितले. गोवा राज्य पासिंग असलेला हा डंपर परवानगी न घेता महाराष्ट्रात आला व ओव्हरलोड मिळाला म्हणून तब्बल एकेचाळीस हजार रुपयांचा दंड गोव्यातील त्या संकेत कांदे या तरुण व्यावसायिकाला देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा व गोव्यातील नाते व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून सिंदुर्गातील अनेक डंपर गोव्यात व गोव्यातील अनेक डंपर सिंधुदुर्गात ये जा करीत असतात. वाळू काळा दगड अन्य मालाची वाहतूक या मार्गावरून होत असते. वाहन चालकांनी नियमांची पायमल्ली करू नये असा कटाक्ष असणे गैर नाही. पण नियमांवर बोट ठेवून काही ठराविकच वाहन चालकांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी टार्गेट करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटली आहे. अनेक बेरोजगार तरुण नोकरी नसल्यामुळे डंपर व्यवसायाकडे वळले आहेत. काही तरुण वाळू खडी बिल्डिंग मटेरियल सप्लाय या व्यवसायाकडे वळले आहेत. या तरुण पिढीकडे राजकीय वजन नसल्यामुळे अधिकारी वर्गाकडून अशा व्यावसायिकांना टार्गेट केले जात असल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत राज्य शासनाकडून दखल घेतली जावी अशी प्रतिक्रिया ही या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.