
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांचे जनता दरबारातील आदेश धुडकावून जिल्हाधिकारी यांचे नावे केलेल्या संमती पत्रांसह बोगस कागदपत्राच्या आधारे केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २४ मार्च २०२५ पर्यंत स्थगिती न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी दिला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात योगेश तांडेल यांनी वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या नियमबाह्य व बेकायदेशीर रस्त्याबाबत गेल्या पाच - सहा वर्षापासून आपण प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच सदर बेकायदेशीर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा पालकमंत्री यांच्या सह जिल्हाधिकारी यांना दिलेला होता. त्या अनुषंगाने मा. पालकमंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथे घेतलेल्या २५ जानेवारी २०२५ च्या जनता दरबारामध्ये महसूल उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सदर नियोजित बैठकीबाबत बांधकाम विभाग यांच्याकडून २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी व्हाट्सअप वर पत्र पाठवण्यात आले. परंतु २१ फेब्रुवारी २०२५ रोजी आपण तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेचा चेअरमन असल्याने व २१ फेब्रुवारी रोजी संस्थेची पहिलीच नियोजित सभा त्याच दिवशी सकाळी ११ वाजता असल्यामुळे तहसीलदार कार्यालय येथे घेण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असे जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
तसेच पालकमंत्री यांनी २५ जानेवारीच्या जनता दरबारामध्ये सूचित केल्याप्रमाणे सदर प्रकरणी नियोजित बैठक ठेवून तसे आम्हाला आगाऊ कळविणे गरजेचे होते. परंतु संबंधित बांधकाम विभागाने सदर सभेला मी उपस्थित राहू नये याकरिता तातडीची बैठक घेऊन दूरध्वनी वरून सदर बैठकीबाबत मला कळविले हे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.
त्यानंतर कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी ५ मार्च रोजी पत्र देऊन १८ मार्च रोजी प्रत्यक्ष कामावर दुपारी १२ वाजता भेट नियोजित केली होती याबाबत मी माझा लेखी जबाब संबंधित सर्व कार्यालयांना सादर केलेला होता.
असे असताना देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार कुठल्याही कायदेशीर बाबींची पडताळणी न करता पुन्हा एकदा सदर रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे हे पूर्णतः नियमबाह्य व बेकायदेशीर आहे.
पालकमंत्री यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये सदर प्रकरणी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले असताना संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार चौकशी करून पालकमंत्र्यांना अहवाल सादर न करता सदर रस्त्याचे काम पुन्हा हाती घेऊन पालकमंत्री यांच्या जनता दरबाराला हरताळ फासली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नियमबाह्य व बेकायदेशीर कामांना पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी पाठीशी घालण्याचे ठरविले असल्यास तसे जाहीर करावे. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अन्याया विरोधात लढण्याची आवश्यकता भासणार नाही.
खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या नियमबाह्य रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी यांचे नावाने केलेली नियमबाह्य संमती पत्रे , प्रस्तावावरील ग्रामसेवकांच्या बोगस सह्या , शासनाच्या नियमांनुसार संपादित न झालेल्या जमिनी, एकाच रस्त्यासाठी झालेल्या दोन निविदा, प्रस्तावावर झालेल्या अल्पवयीन मुलांच्या सह्या अशा अनेक बाबींनी नियमबाह्य असलेल्या रस्त्याच्या कामाला २४ मार्च २०२५ पर्यंत स्थगिती देऊन नियमबाह्य कामाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई न झाल्यास २४ मार्च नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडून प्रशासनाचे लक्ष वेधून घ्यावे लागणार आहेत. तरी सदर नियमबाह्य व बेकायदेशीर कामाला तात्काळ स्थगिती द्यावी . व शासनाचा १ कोटी ७२ लाख रुपये निधी वाचवावा. असेही योगेश तांडेल यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.