
देवगड : कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असून त्या व्यक्तीने आपल्या हक्काची व कर्तव्याची माहिती घेऊन व हक्काची व जबाबदारीची जाणीव असणे ही महत्त्वाचे आहे .प्रत्येक ग्राहकाने जागरूकता दाखवली तर निश्चितपणे ग्राहकाची फसवणूक टाळता येते यासाठी ऑनलाईन खरेदी वेबसाईट व ॲपच्या माध्यमातून करीत असताना त्या वेबसाईटची अथवा अँप ची सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी देखील त्या ग्राहकाची आहे. आधुनिक युगात बाजारपेठेत मिळणारे डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात ग्राहकांची फसवणूक होते यासाठी विविध सेवा ग्राहक उपयोग करतो व यामधून ऑनलाईन वस्तू द्वारे फसवणूक होत असताना २०१९ पासून ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणण्यात आला आहे. यात ग्राहकांचे सहा अधिकार नमूद करण्यात आले असून त्या अधिकारांची माहिती अथवा हक्कांची माहिती करून घेणे व प्रत्येक ग्राहकाने जागरूकता बाळगणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी देवगड येथे जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना केले.
अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य ,जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग पुरवठा विभाग यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन देवगड तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते .यावेळी व्यासपीठावर तहसीलदार रमेश पवार नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर तालुका ग्राहक मंचाचे अध्यक्ष नारायण माने ग्राहक मंच तालुका प्रसिद्धीप्रमुख दयानंद मांगले पुरवठा निरीक्षक एस.डी गुट्टे उपस्थित होते. सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार दीपप्रज्वलाने या ग्राहक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवगड तालुकाध्यक्ष नारायण माने यांनी करून ग्राहक दिनाविषयी माहिती विशद केली. यानिमित्तानेग्राहकांचे सहा हक्क त्याचप्रमाणे वस्तू व सेवा खरेदी करताना घ्यावयाची काळजी किंमत वैधता, वजन, गॅरंटी, राष्ट्रीय सायबर क्राईम ग्राहकांसाठी हेल्पलाइन याविषयी सविस्तर माहिती तालुका प्रसिद्ध प्रमुख दयानंद मांगले यांनी विशद केली. रास्त दर धान्य दुकान प्रतिनिधी श्रीराम तिर्लोटकर ,सहकार समृद्धी गॅस एजन्सी सदस्य श्याम कदम,यांनी ग्राहक फसवणूक बाबत मार्गदर्शन केले.
महसूल सहायक प्रदीप कदम यांनी ग्राहक संरक्षण कायदा सविस्तर माहिती दिली तसेच ग्राहकांची फसवणूक अथवा नुकसान भरपाईबाबत जिल्हास्तर राज्य स्तर रचना याबाबत माहिती विशद करून वस्तू व सेवा खरेदी करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले. आभार पुरवठा निरीक्षक सुनील बेबले यांनी मानले.