
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर, आशिष महाजन यांचे घर आहे. शेतीची आवड असल्याने पुण्यातून कोकणात येऊन, येथे त्यांनी घर बांधले आहे. शेती करतात, झाडे लावली आहेत. त्याभागातील प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. घरात आशिष महाजन आणि त्यांची पत्नी असे दोघेच राहतात. जवळपास दुसरे घर नाही.
शनिवार, ता.१५ मार्च, मध्यरात्री १२ वाजण्याच्या दरम्यान, अंधार आणि जंगलाचा परिसर असल्याने भयाण शांतता असताना, अचानक बाहेर कुत्रे जोरात भुंकू लागले म्हणून, आशिष महाजन, शेतीनिमित्त लागणारी अवजारातील, कांबेरू आणि बॅटरी घेऊन घराचा मागील दरवाजा उघडून बाहेर येताच, बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने महाजनांवर जोरदार हल्ला सुरु केला होता. त्यात ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी ही बचावात्मक पवित्रा घेत बिबट्यावर प्रतीहल्ला सुरु केला. पतीवरील संकट पाहून सौ.महाजन ही मदतीला धावल्या , दोघांनी मिळून सर्व बळ एकवटून बिबट्यावर प्रतिहल्ला सुरु केला. त्यांच्या एकत्रित केलेल्या बचाव प्रयत्नांना यश आले. या झटापटीत उपाशीपोटी असलेला बिबट्याही गंंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने जीव सोडला. मात्र आशिष महाजन हे गंभीर जखमी झाले, रक्तबंबाळ झाले.
सौ.महाजन यांनी समोरचे दृष्य पाहून आरडा ओरड, मदतीसाठी आवाज दिल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून आले. माहिती मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी ही दाखल झाले. वनअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रीच आशिष महाजन यांना रक्तबंबाळ अवस्थेत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. वालावलकर रुग्णालयातील ,मेडीसिन, व सर्जरी डिपार्टमेंट अंतर्गत, संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. अंकिता कुलकर्णी , डॉ. देवेश अगरवाल , डॉ.आकाश कुंभार , सर्जरी डॉ. संग्राम दाभोळकर ,डॉ. अंकिता हुले उपचार करीत आहेत. सध्या महाजन यांची प्रकृती स्थिर आहे, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.
आशिष महाजन यांच्या शेती आणि घराच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या भक्षाच्या शोधात फिरत होता. श्री . महाजन यांनी वनविभागाला यांची माहिती दिली होती. मात्र वनविभागाकडून त्याच्या माहितीकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना झाली, असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.या हल्ल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदिप सावंत यांचेकडून मिळाल्यानंतर वनविभागाची धावाधाव सुरु झाली. वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
महाजन यांना रुग्णालयात दाखल करून वनअधिकारी यांनी पाहणी केली, पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
चिपळूण तालुक्यातील तोंडली, पिलवली, पाते पिलवली, वारेली , मुर्तवडे या दुर्गम आणि जंगलमय परिसरात बिबट्यांचा कायम वावर आढळून येतो. मागीलवर्षी अशीच घटना घडली होती. एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ती महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेच्या घरात माळ्यावर बिबट्या रात्रभर दबा धरुन बसला होता. दुसर्या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढले होते. यापरिसरातील बिबट्या आणि वन्य प्राण्यांच्या वावरामुळे ग्रामस्थ दहशती खाली वावरत आहेत.