त्यामुळे सार्वत्रिक खुजेपणाचा प्रत्यय : प्रा. प्रवीण बांदेकर

'आम्ही साहित्यप्रेमी'च्या कार्यक्रमात प्रतिपादन
Edited by:
Published on: February 28, 2025 12:33 PM
views 233  views

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षात शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रात जो सार्वत्रिक खुजेपणा दिसुन येतो, त्याचे कारण साहित्य आणि वाचनापासून घेतलेली फारकत हेच आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी नुकतेच येथे केले.


'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या व्यासपीठाने ओरोस येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर व्यासपीठावर उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  प्रा. बांदेकर यांनी आपल्या सुमारे पाऊण तासाच्या भाषणात 'वाचन संस्कृतीवरील आक्रमणे आणि त्याचे दुष्परिणाम' या विषयावर महत्त्वपूर्ण विवेचन केले.


 ते म्हणाले, वाचन संस्कृती ही अलीकडची आहे. त्याआधी श्रवणसंस्कृती होती. एकाने दुसऱ्याला सांगितलेली गोष्ट, यातून साहित्यनिर्मितीचा पाया रचला गेला. लोकपरंपरेतून आणि श्रवणसंस्कृतीतून ज्ञानाचा प्रसार होत गेला. प्राचीन काळी जेव्हा आजच्यासारखे साहित्यप्रकार आणि ग्रंथ नव्हते, त्याकाळी मनुष्य निसर्गवाचन करीत होता. निसर्गातील घडामोडी टिपत होता. यामुळे तो निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या अगदी जवळ होता. पुढील काळात श्रवणसंस्कृतीचे रुपांतर वाचनसंस्कृतीत झाले. ज्या काळी मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळी वाचन हे मनोरंजनापुरते किंवा आध्यात्मिक कारणांसाठी होत असे. पुढील काळात ज्ञानप्राप्ती हा वाचनाचा उद्देश होत गेला.


 वाचनामुळे स्वतःला समजून घेता येते, असे सांगुन प्रा. बांदेकर म्हणाले की, पुस्तके स्वतःकडे बघायला शिकवतात. मानवी विकासाच्या प्रक्रियेमध्ये विचार खूप महत्त्वाचा आहे. साहित्य विचार करायला शिकवते. मानवी मेंदूच्या आणि बुद्धीचा विकासामध्ये साहित्य आणि वाचन यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. यामुळेच मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. कारण तो विचार करतो. मात्र विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे वाचन जवळपास बंद झाले आहे. यामुळेच आज समाजाच्या सर्व थरांमध्ये एक प्रकारचा खुजेपणा दिसून येतो. आपल्या जिल्ह्याने बॅ. नाथ पै, प्रा मधु दंडवते यांच्यासारखे अभ्यासू, ज्ञानी आणि कुशल संसदपटू राजकारणी देशाला दिले. या नेत्यांनी विविध भाषा आत्मसात करुन, उत्तम ग्रंथांचे वाचन करुन स्वतःला समृद्ध केले आणि त्याचा फायदा समाजाला मिळवून दिला.


कोणाचाही नामोल्लेख न करता प्रा. बांदेकर म्हणाले की, नाथ पै, मधु दंडवते यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा आता कुठेही दिसत नाही. आजच्या राजकीय नेत्यांकडे पाहिले असता किती घसरण झाली आहे, हे लक्षात येईल. राजकारणाप्रमाणेच शिक्षणक्षेत्राची ही अशीच अवस्था आहे. ज्या शिक्षकांनी नवी पिढी घडवायची ते शिक्षक किती पुस्तके विकत घेतात, किती पुस्तके वाचतात, हा चिंतेचा विषय झाला आहे, शिक्षकी पेशातील अनेकजण वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. शाळेत शिकवायला जायचे आणि आपला डंपर आज कोठे गेला असेल, याचा विचार करीत बसायचे, असे शिक्षक कोणती पिढी घडवणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


राजकारण आणि शिक्षण ही दोन क्षेत्रे वानगीदाखल सांगितली आहेत. परंतु समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये साहित्य, संस्कृती, वाचन याबद्दल अशीच उदासीनता दिसून येते आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे दारुण चित्र अत्यंत चिंताजनक आहे. सर्वसामान्य माणसाचे चित्र काही वेगळे नाही, असे सांगून ते म्हणाले की, संमोहन, बधिरीकरण आणि विस्मरण या शस्त्रांचा मारा सर्वसामान्यांवर केला जातो. विशिष्ट विचारधारा व्यक्तीस्तोम वाजवून समाजमन संमोहित करतात. आपला नेता सांगेल तेच खरे, असे असा भ्रम निर्माण केला जातो. यामुळे विचार करण्याची शक्ती खुंटते. स्वतःवरचे नियंत्रण गमावले जाते. याचबरोबर वैद्यकीय उपचार करताना ज्याप्रमाणे भूल दिली जाते, त्याप्रमाणे मानवी मेंदूचे बधिरीकरण वेगवेगळ्या उपायांनी केले जात आहे. यामुळे समाजमनाला विस्मरणाची व्याधी जडली आहे. रोज नवनव्या गोष्टी पुढे आणून आपल्याला अडचणीच्या गोष्टी विसरायला लावणे आणि लोकांना नवनव्या अनावश्यक घटनांमध्ये गुंतवून ठेवण्याचे प्रकार होत आहेत. ही सर्व परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. संमोहन, बधिरीकरण आणि विस्मरण या जाळ्यातून बाहेर पडायचे असेल तर पुन्हा एकदा वाचनाकडे आणि वाचनातून ज्ञानप्राप्तीकडे वळावे लागेल, अन्यथा भविष्यकाळ फार चिंताजनक असेल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.


 कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी 'आम्ही साहित्य'प्रेमी या व्यासपीठाची संकल्पना स्पष्ट केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे साहित्यिक उपक्रमांची असलेली उणीव भरून काढण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे, असे ते म्हणाले. 'डोक्यावर सोनेरी मुकुट धारण करून मायमराठी फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या दारात उभी आहे', अशी खंत एकेकाळी कविवर्य कुसुमाग्रज यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनीसुद्धा त्यांनी 'पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करु नका', ही कविता लिहून आपल्या मनातील वेदना स्पष्ट केली होती. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. हा प्रवास खूप मोठा आहे. मात्र यामागे कुसुमाग्रजांची प्रेरणा महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.


श्री. लळीत यांनी प्रा. बांदेकर आणि कवी दादा मडकईकर यांचा परिचय करुन दिला. वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर यांच्या हस्ते प्रा. बांदेकर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन, तर डॉ. सई लळीत यांच्याहस्ते दादा मडकईकर यांना शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. मडकईकर यांनी विविध मालवणी कविता सादर करून मोठी बहार आणली सुमारे सव्वा तास त्यांनी मराठी आणि मालवणीतील अनेक कविता उत्तम आवाजात सादर केल्या. कवितेला चाली लावण्यासाठी आपल्या मुलाला 'उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले' या कवितेला शिक्षकांनी लावून दिलेली चुकीची चाल कारणीभूत ठरली, असे सांगून त्यांनी आपला संपूर्ण काव्य प्रवास श्रोत्यांसमोर उलगडून दाखवला.


कविता ही शब्दप्रधान असली पाहिजे. कवितेत शब्द महत्त्वाचा, त्याबरोबरच निरीक्षणशक्तीही खूप महत्त्वाची आहे. आपल्या आसपास काय घडते आहे, हे टिपता आले पाहिजे. निसर्गाचे विभ्रम टिपता आले पाहिजेत. अशी निरीक्षणशक्ती आणि शब्द तुमच्याकडे असतील तर कोणीही कविता लिहू शकतो, असे श्री मडकईकर म्हणाले. पळस फुललो रानात, तारया मामा तारया मामा, आज तारीख सत्रा, चांन्न्याची फुला अशा एकापेक्षा एक स्वरचित सरस मालवणी कविता गाऊन दादांनी कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला.


या कार्यक्रमाला निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते. श्री. सतीश लळीत यांच्याहस्ते त्यांना ग्रंथ भेट देण्यात आला. श्री. शेवाळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना नवीन उपक्रमाचे कौतुक करुन जिल्हा प्रशासन अशा कार्यक्रमांच्या पाठीशी सक्रीयपणे उभे राहिल, असे सांगितले. हा कार्यक्रम प्रायोजित करणारे सर्वश्री प्रकाश जैतापकर, उदयकुमार जांभवडेकर, संतोष कदम, श्रीराम चव्हाण यांचा यावेळी ऋणनिर्देश करण्यात आला. 'आम्ही साहित्यप्रेमी' व्यासपीठाच्या या पहिल्या उपक्रमास रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. देसाई वाचनालयाच्या ग्रंथपाल नेहा कशाळीकर यांनी कवी ग. ह. पाटील यांची 'देवा तुझे किती सुंदर आकाश' ही कविता गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. 'आम्ही साहित्यप्रेमी' व्यासपीठातर्फे दर महिन्यात एक कार्यक्रम घेतला जाणार असून पुढील महिन्याचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.