
मालवण : गोळवण ग्रामपंचायतीच्यावतीने परप्रांतीय व्यक्तीला दिलेल्या घर पत्रक उताराच्या विषयी आज सर्वपक्षीय ग्रामस्थांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रार करत तातडीने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान तहसीलदार वर्षा झालटे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवर संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येईल त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थांनी गोळवण ग्रामपंचायतच्या कारभाराच्या पर्दाफाश तहसीलदारांसमोर केले. ग्रामपंचायत कार्यालयात घरकुल योजनेचा निधी दिला जातो पण घरकुलच बांधली जात नाही. ग्रामपंचायतच्या समोरचे लोखंडी गेट चोरीला गेले तरी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील पाईप चोरीला जातात त्यावर कारवाई नाही. आरोग्य विभागाच्या पाण्याच्या पंपाचे इंजिन चोरीला जाते तरी कारवाई होत नाही, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ग्रामपंचायतीत असलेल्या शासकीय विभागांमध्ये घडत असू नये ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सकल हिंदू समाजाच्यावतीने गोळवण ग्रामस्थांना पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभाग घेण्यात आला होता. यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, अवी सामंत, अनिकेत फाटक, बाबी जोगी, प्रसाद आडवणकर, दिपक पाटकर, भाऊ मोरर्जे, हरेश फडते, महेश जुवाटकर तसेच इतरही उपस्थित होते.
परप्रांतीय व्यक्तीला दिलेले रेशन कार्ड कशाप्रकारे देण्यात आले. यासाठी दाखल केलेली कागदपत्रे कोणी कोणी बनवून दिली. कोणती कागदपत्रे योग्य आहेत. कोणती कागदपत्रे बोगस बनवण्यात आली. याची शहानिशा करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकरण सादर करण्यात येईल आणि अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसीलदारानी स्पष्ट केले.
दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तहसीलदारांची भेट घेत गोळवण ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. जर ग्रामपंचायतीकडून चुकीच्या पद्धतीने परप्रांतीय व्यक्तींना घरपत्रक उतारा आणि आश्रय देण्यात येत असेल तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका सामंत यांनी मांडली. यावेळी ग्रामस्थांनी सामंत यांच्या भूमिकेला समर्थन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली.
गोळवण गावातील परप्रांतीय व्यक्तीकडे रेशन कार्ड आणि त्याला धान्य मिळू लागल्याची माहिती मिळताच लोकांकडून झालेल्या उठावामुळे परप्रांतीय व्यक्तीने जबरदस्तीने ताबा घेतलेल्या घरातला ताबा पुन्हा घरमालकाने घेतला आहे. तसेच सध्या तो पळून गेला आहे. गावात सध्या तो दिसून येत नसून त्याचे भंगाराचे सामान गावातील काही मंडळी सरपंचांच्या आशीर्वादाने सांभाळत आहेत असाही आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. तसेच परप्रांतीय व्यक्तीचा शोध घेऊन त्याचे मोबाईल लोकेशन चेक करून त्याच्यावर बोगस कागदपत्रे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यावेळी उबाठा शहरप्रमुख बाबी जोगी यांनीही ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी गोळवण गावातील विषयावर तीव्र नाराजी व्यक्त करत या सर्व प्रकरणात गोळवण ग्रामपंचायतीचे सरपंच हेच दोषी असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस पालकमंत्री आणि स्थानिक आमदार दाखवतील काय? असा सवाल उपस्थित केला आहे. सरपंच यांच्याच मुळे अशा प्रकारचे कागदपत्रे निर्माण केली गेली असून घरपत्रक उताऱ्यावर असलेले हस्ताक्षर हे ज्या व्यक्तीचे आहे आणि घर नंबर देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावरही कारवाई केली गेली पाहिजे, असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.
तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत सध्या बोगस घरपत्रक उतारा प्रकरणावरून जोरदार चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे एकच व्यक्ती सरपंच म्हणून राहिलेले विद्यमान सरपंच यांचा साळसुदपणाचा बुरखा यानिमित्ताने फाटला गेल्याचे दिसून येत आहे. आज एक प्रकरण बाहेर येताच "तो मी नव्हेच" अशी आव आणणारे सरपंच यांनी अनेक वर्षे पदावर राहिलेले असताना किती बोगस कामे केली असतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? आपलाच एक माणूस आमच्या वेळोवेळी धाऊन येणारा अडीअडचणीत साथ देणारा म्हणून ओळख असलेला माणूस आज बनावट घरपत्रक उताऱ्यामुळे चर्चेत आला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून मागील कित्येक वर्षात पद उपभोगत असताना नक्की किती घोटाळा केला असेल याची चौकशी सुद्धा शासन स्तरावर व्हावी अशी प्रमुख मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेऊन जर शासनाने याची चौकशी केल्यास गेल्या अनेक वर्षातील घोटाळे समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासंदर्भात लवकरच मनसेचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग तसेच पालकमंत्री यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी सांगितले.