
सिंधुदुर्गनगरी : मूळ प्रश्न समजल्याशिवाय त्याचे उत्तर शोधता येत नाही. त्यामुळे सहकार समजण्यासाठी त्याचे कायदे समजले पाहिजेत. त्याचा अभ्यास केला पाहिजे. तरच सहकारात विश्वासाहर्ता वाढेल, असे प्रतिपादन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ सोपान शिंदे यांनी सहकारी संस्थांचे सक्षमीकरण कार्यशाळेत बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्था सभागृहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षत्रिय कार्यालयीन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत आयोजित कार्यक्रमात डॉ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कणकवली सहाय्यक उपनिबंधक के आर धुळप, कुडाळ सहाय्यक उपनिबंधक सुनील मर्वळ, सावंतवाडी सहाय्यक उपनिबंधक सुजय कदम, सुनील नाईक, श्रीमती लोबो आदी उपस्थित होते. यावेळी उपनिबंधक डॉ शिंदे यांनी लिहिलेले व जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था प्रकाशित सहकारी पतसंस्थासाठी प्रमुख परिपत्रके/निदेश या पुस्तिकेचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे.
यावेळी पुढे बोलताना डॉ शिंदे यांनी, सहकार चळवळीत सर्वांनी काम केले पाहिजे. जिल्ह्यात सहकारातील व्यक्तीने, संस्थेने कोणतेतरी एक चांगले काम केले पाहिजे. सातत्याने काम करताना एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक महिन्यात आपल्याला एकतरी समाजोपयोगी कार्यक्रम करायचा आहे. त्याची सुरुवात आज आम्ही कार्यालयाच्यावतीने केली आहे. यात समाज विकास, संस्था विकास याला प्राधान्य दिले पाहिजे. या अंतर्गत सहकारातील व्यक्तींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आज जी पुस्तिका दिली आहे त्याचा अभ्यास करा. यामुळे ऑडिट वर्ग अ कसा राहील ? याची माहिती मिळेल. चुकीचे काम होणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा हक्क याबाबत सुध्दा माहिती दिली जाणार आहे, असे सांगितले.
दुसरा, चौथा आठवडा सिंधुदुर्गात
सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदाचा पदभार आपल्याकडे आहे. मी दुसरा आणि चौथा आठवडा सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिला आहे. सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मी कार्यालयात असणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणीही समस्या घेवून येवू शकता, असे यावेळी डॉ शिंदे यांनी सांगितले. यावेळी २५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या ९० संस्थांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय यांच्या माध्यमातून आणि जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, जिल्हा आरोग्य सेवा कर्मचारी सहकारी, जिल्हा वैश्य समाज सहकारी, जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी, कोचरे उत्कर्ष (डॉ शिरोडकर) सहकारी आणि जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी या पतसंस्थांच्या पुढाकारातून संपन्न झाला.