
मंडगणड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष , प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘वेस्टर्न घाट निसर्ग मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून वेळास येथील कासवमित्र श्री. मोहन उपाध्ये हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. शैलेश भैसारे, डॉ. विष्णु जायभाये, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. शैलेश भैसारे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करुन कार्यक्रमाचा उदे्दश स्पष्ट केला तर डॉ. संगीता घाडगे यांनी प्रमुख उद्घाटक कासवमित्र श्री. मोहन उपाध्ये यांची थोडक्यात ओळख करुन दिली.
मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. मोहन उपाध्ये म्हणाले की, आज निसर्गातील वन्यजीव व विविध वनस्पतींचे संरक्षण करणे आज काळाची गरज बनली आहे. कारण अनेक प्रकारचे जीव व वनस्पती आजच्या आधुनिक युगात नष्ट होत चाललेल्या आहेत. त्या नष्ट होण्यामागील अनेक कारणे आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजची होणारी जंगलतोड होय. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील विविध वन्यजीव संवर्धन मोहिमेमधील यशस्वी झालेली एक मोहीम म्हणजे सागरी कासव संवर्धन मोहीम होय. महाविद्यालयाने सदर निसर्ग मंडळ स्थापन केल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या घरी एक झाड लावून त्याचे संगोपण करावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लावावा असे अहवान त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षिय समारोप करताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की अशा प्रकारच्या विविध उपक्रमाव्दारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले जाते. निसर्गाचे संरक्षण होणे आज आवश्यक बनले असून जर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्षतोड थांबवणे गरजेचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या भागात जाऊन समाजामध्ये निसर्ग व वन्यजीव संरक्षणासंबंधी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी केले, तर आभार डॉ. विनोदकूमार चव्हाण यांनी मानले.