कोमसापच्या सावंतवाडीतील संमेलनाचं मंत्री नितेश राणेंना निमंत्रण

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 17:32 PM
views 184  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सावंतवाडी येथे होणार आहे. 22 मार्चला होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाचे उद्घाटक पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी या साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वास्त केल.

जिल्ह्यात कित्येक वर्षानंतर भव्य दिव्य असे साहित्य संमेलन सावंतवाडीत होत आहे. या संमेलनाला आपण आवर्जून उपस्थित राहणार असे मंत्री राणेंनी स्पष्ट केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे घेण्याचे आठ दिवसापूर्वी निश्चित झाले आहे. सावंतवाडी शाखेचे आयोजन असलेले हे साहित्य संमेलन संस्थानकालीन नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध समित्या गठीत केल्या जाणार आहेत. या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांची एक मताने निवड बैठकीत करण्यात आली. श्री केसरकर यांनी स्वागताध्यक्ष म्हणून आपण निश्चितपणे हे संमेलन यशस्वी करू अशी ग्वाही दिली आहे.

लवकरच त्यांच्या उपस्थितीत येत्या आठ दिवसात संमेलनाच्या नियोजना संदर्भात बैठक घेतली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संस्था तसेच सर्व घटकांना सहभागी करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य चळवळ अधिक व्यापक  पुढे नेण्याच्या दृष्टीने हे साहित्य संमेलन फार महत्त्वाचे मानले जात आहे. गाव तेथे साहित्य चळवळ अशी संकल्पना या साहित्य संमेलनाची आहे. सावंतवाडी नगरीत साहित्य संमेलन व्हावे अशी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची इच्छा आहे.  सावंतवाडी येथे ते स्वतः उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटक पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सावंतवाडीचे तालुका अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे,  ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, जिल्हा संचालक महेश सारंग, माजी सभापती उदय नाईक आदी उपस्थित होते. श्री राणे यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यांनी आवर्जून या साहित्य संमेलना उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिक सांस्कृतिक नाट्य परंपरा आहे. ही परंपरा टिकवण्याचे काम आपले साहित्य प्रेमी करत आहेत. अनेक साहित्यरत्न या जिल्ह्याने दिले आहेत.त्यामुळे हे कित्येक वर्षानंतर होणारे साहित्य संमेलन आपण सर्वांनी एक होऊन भव्य दिव्य पद्धतीने करूया असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.