
कणकवली : एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री आर्या बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. 'सरोगेट मदर ' या कवितेसाठी या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने बागवे यांचा गौरव करण्यात आला आहे.
मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे मुंबई एकता कल्चर अकादमीचा वार्षिक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी शिवाजी गावडे यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री आर्या बागवे यांना गौरविण्यात आले. यावेळी एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, स्त्रीवादी कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर,चित्रकार प्रदीप म्हापसेकर, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आर्या बागवे या गेली काही वर्ष सातत्याने निष्ठेने कविता लिहीत असून त्यांना यापूर्वी विविध काव्य स्पर्धेत पारितोषिकही प्राप्त झाली आहेत.त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्या चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.