दोडामार्ग : ग्रामविकासाचे मंदिर म्हणून ग्रामविकासात अत्यंत महत्वाचा दुवा असलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक तथा आताचे ग्रामपंचायत अधिकारी ही दोन्ही चाके जर दूरदृष्टी ठेवून काम करत असतील त्या गावचा ग्रामविकासाचा गाडा वेगाने दौडत असतो. सरपंच व सदस्य यांनी मांडलेल्या अनेक विकासकामाना तडीस न्यायचे असेल किंबहुना ग्रामविकासात काही हटके करायचे असेल तर या ग्रामपंचायतच्या संपूर्ण कार्यकारिणीला गावचे ग्रामपंचायत अधिकारी यांचं मार्गदर्शन व सहकार्य अत्यंत महत्वाचं असतं. दोडामार्ग तालुक्यात मणेरी गावातही अशाच सांघिक कामांची प्रेरणादायी सुरवात ग्रामविकासात पाहायला मिळते आहे.
ग्रामपंचायतने नुकत्याच सपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनाचं ओचित्य साधून गावातील काही शाळकरी मुलीना अत्यंत गरजेच्या अशा सायकल वाटपाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. ग्रामपंचायत कार्यकारणी व ग्रामपंचायत अधिकारी अशोक गायकवाड यांच्या संल्पनेतून महिला व बाल कल्याण १०% निधी मधून असा हा उपक्रम राबविण्यात आला. मणेरी गावातील गरीब व अल्पउत्पन्न गटातील ८ मुलीना ग्रामपंचायत सरपंच सिद्धी कांबळे उपसरपंच विशाल परब ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे ग्राम वासियांतुन विशेष कौतुक करण्यात येत आहे.
इतकंच नव्हे तर मणेरी ग्रामपंचायतकडून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, माझी वसुंधरा अभियाना ५.० अंतर्गत ग्रामपंचायतने उभारलेली प्रवेशद्वार कमान ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम नंतर झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ यांचे कडून ग्रामपंचायत कार्यकारणी व ग्रामपंचायत अधिकारी गायकवाड यांचे या साघिक प्रेरणादायी उपक्रम व ग्रामविकासातील पुढच्या पाऊला बद्दल विशेष कौतुक करण्यात आले.