
देवगड : करिअर कट्टा या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये शिरगाव येथील पुंडलिक कर्ले महाविद्यालयाने जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे. देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला, वाणिज्य महाविद्यालयाला तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या २०२४-२५ मधील करियर कट्टा या राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये उत्तुंगयश मिळाले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, संचालक राजेंद्र शेट्ये, हेमंत देसाई, प्रकाश गोठणकर, प्राचार्य समीर तारी, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मानद अधीक्षक संदीप साटम, प्राचार्य शमशुद्दीन अत्तार आदी उपस्थित होते.
करिअर कट्टा ही राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा २२ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली. स्पर्धेचा निकाल २६ जानेवारीला घोषित करण्यात आला. यात महाविद्यालयाच्या प्राध्यापिकाअक्षता मोंडकर सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. तर उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय म्हणून शिरगावच्या कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.