वेंगुर्ला : येथील नावबाग खाडी तसेच समुद्र व खाडीच्या मुखाजवळ नाबार्ड टप्पा २४ अंतर्गत मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना सोई सुविधा पुरवणे या हेड खाली विविध कामांसाठी सुमारे ३१ कोटी ४४ लाख एवढा निधी प्राप्त झाला. याचे कामही सुरू करण्यात आले. मात्र मंजूर प्रकल्पातील कामाचा दर्जा आणि प्रत्याक्षात झालेले काम यामध्ये बराच फरक असल्याच्या मच्छिमार बांधवांच्या तक्रारी मच्छिमार सोसायटीकडे वारंवार सुरू आहेत. याबाबत संस्थेमार्फत मत्स्यव्यवसाय विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने. तसेच संस्थेला लेखी उत्तर न आल्यामुळे येथील मच्छिमार संतप्त झालेले असून मच्छिमारांच्या हिताचा विचार करता संस्था पदाधिकारी, स्थानिक मच्छिमारांसमवेत २६ जानेवारी २०२५ रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसत असल्याचा इशारा वेंगुर्ला मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
मच्छिमार सोसायटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, येथील नावबाग खाडी तसेच समुद्र व खाडीच्या मुखाजवळ नाबार्ड टप्पा २४ अंतर्गत मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना सोई सुविधा पुरवणे या हेड खाली ५०० मीटर ब्रेक वॉटर बंधारा, ५० मी × २० मी बोट यार्ड, ३०० मी अप्रोज रोड, ६०० मी गाळ उपसा करणे, ३० नग सोलार स्ट्रीट लाईट, ४३.५० मी जेटी विस्तारीकरण अशी सहा कामे मंजूर झाली आहेत. दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी या कामाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदार यांना देण्यात आले. सन २०२० साली हे काम प्रत्यक्षात सुरु करण्यात आले. काम सुरु असताना कामातील काही चूका स्थानिक मच्छिमारांनी संस्था पदाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु कामाच्या ठिकाणी शासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे याबाबत तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न निर्माण होत असे. यानंतर या कामातील चुकांबाबत मत्स्यव्यवसाय खात्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार केली. परंतु त्याची कोणीच दखल घेतली नाही.
या मंजूर प्रकल्पातील कामाचा दर्जा आणि प्रत्याक्षात झालेले काम यामध्ये बराच फरक असल्यामुळे संस्थेकडे स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारी वाढतच गेल्या. शेवटी मालवण मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त श्री. कुवेसकर यांनी दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकल्पातील कामाची स्थानिक मच्छिमारांसमवेत पाहणी केली व स्थानिक मच्छिमारांच्या समस्या व कामातील त्रूटी आयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई यांना पाठविल्या.
मालवण मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या पत्रानुसार दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी कार्यकारी अभियंता मत्स्यव्यवसाय मुंबई, कनिष्ठ अभियंता मुंबई, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण सिंधुदुर्ग यानी संबधित दोन कंत्राटदार याचे प्रतिनिधी, संस्था पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार यांच्या समवेत सदर प्रकल्पातील प्रत्येक कामाची संयुक्त पाहणी केली. शासनाचे पत्र असूनसुद्धा मुख्य दोन्ही कंत्राटदार पाहणी वेळी उपस्थित राहिले नाहीत. शासनाच्या मंजूर पत्रानुसार ब्रेकींग वॉटर बंधारा व खाडी ड्रेझिंगचे काम झालेले नाही हे कार्यकारी अभियंता, मत्स्यव्यवसाय मुंबई ललित गौरी गिरी बुवा यांनी त्याच ठिकाणी तोंडी कबूल केले. खाडी ड्रेझिंगची वाळू बंधा-याच्या दक्षिण दिशेला व खाडी मुखाजवळ टाकल्यामुळे तेथे वाळूचा थर निर्माण होऊन तसेच, सर्व कामे अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे त्या ठिकाणी मच्छिमारांच्या नौकेचा अपघात होऊन जिवीत हानी होण्याच्या शक्यता आहे. हे सुद्धा त्यांना मच्छिमारांनी दाखविले. यावर आपण चार दिवसात लेखी उत्तर देतो. व संबधितांवर त्वरीत कारवाई करतो असे त्यांनी संस्था पदाधिका-यांना तोंडी सांगितले.
परंतु अजूनही संस्थेस काहीच लेखी उत्तर न आल्यामुळे तसेच हा मच्छिमारांचा जीवन मरणाचा व उदरनिर्वाहा चा प्रश्न असल्यामुळे मच्छिमारांच्या हिताचा विचार करता येथील मच्छिमार संतप्त झालेला असून आम्ही संस्था पदाधिकारी स्थानिक मच्छिमारांसमवेत २६ जानेवारी २०२५ रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसत आहोत. असे म्हटले आहे.