सावर्डे : सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे संचलित आणि महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या - चित्र शिल्प कलामहाविद्यालयाचे ३१ वे वार्षिक कलाप्रदर्शन, आज बुधवार ता.१५ जानेवारी सकाळी ११ वाजता, गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या शिक्षणमहर्षि गोविंदराव निकम सभागृहात झाले.
या उद्घाटन कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियातून आलेले ए.जी.मर्चंड सर्व्हिसेस न्यू साउथ वेल्स चे सहसंचालक ऑलिवर मर्चंड, अनिरुद्ध निकम, सौ.पूजाताई निकम, प्रशांत निकम, सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संचालक मारुती घाग, रायगड जिल्ह्यातील कलाशिक्षक सलीम अल्लाबक्ष मणेरी आणि त्यांच्या पत्नी सौ.मणेरी, कोल्हापूरचे चित्रकार बबन माने, विजय उपाध्ये, प्रसिद्ध शिल्पकार संदीप ताम्हणकर, ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, आदी उपस्थित होते.
या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी दिला जाणारा, शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार रायगड चे कलाशिक्षक सलीम अल्लाबक्ष मणेरी यांना संचालक मारुती घाग यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
कलाशिक्षक सलीम अल्लाबक्ष मणेरी यांनी या पुरस्काराचे श्रेय आपले कुटुंब आणि शिक्षकमित्र आणि विद्यार्थ्यांना दिले. ते म्हणाले , एक कलाशिक्षक जेव्हा मुलांना स्वत: चित्र काढून प्रात्यक्षिक दाखवतो, तेव्हा त्यांना तो विषय लवकर समजतो. चित्रातील छटा, पोत आदी गोष्टी लक्षात येतात. आपण मुलांच्या प्रश्नांचा प्रथम अभ्यास करून, स्वत घरी सराव करतो आणि मग मुलांनाही त्याचे प्रात्यक्षिक देऊन समजवून सांगतो. त्यामुळेच या पुरस्काराचे खरे श्रेय माझ्या विद्यार्थ्यांचे आहे. " असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियन पाहुणे ऑलिवर मर्चंड यांनी कलाप्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून आनंद झाल्याचे सांगून, सर्वांचे अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना पुढील करियरसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरचे चित्रकार बबन माने म्हणाले, सह्याद्रि च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे परिक्षण करताना , त्यांची तुलना मुंबई पुण्यासारख्या शहरातील कलाकृतींशी करायची झाल्यास, या कलाकृती सरस आहेत. सह्याद्रिच्या विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता, मोठ्या शहरांत जाऊन आपले पुढील करीयर घडवावे.
प्रसिद्ध शिल्पकार संदिप ताम्हणकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कलाकृतींचे प्रशिक्षणाचे निमित्ताने आपल्या महाविद्यालय पुन्हा येऊन काहीतरी नवीन शिकायला मिळते हा आनंद जास्त आहे. आम्ही परिक्षण करताना कलाकृतीसाठी वापरलेले माध्यम, रचना, पोत आदीचा विचार केलेला आहे. मी सुद्धा याच सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आणि "आज देशपातळीवरील दर्जाचे शिल्पकाम येथे स्थानिक पातळीवर करीत आहे. आज देशपातळीवर ज्या मूल्याने शिल्पकाम चालते, त्याच मूल्याला मी ही शिल्पकाम येथून करीत आहे."ही खरी कलेची ताकद आहे. पुढे मुलांना मार्गदर्शन करताना श्री. ताम्हणकर म्हणाले, आज डिजिटल युगात अचूक आणि कलात्मक शिल्पकाम करणे सोपे झाले आहे. त्यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आर्ट कॉलेज चे चेअरमन प्रा.प्रकाश राजेशिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार प्रदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य माणिक यादव आणि सूत्रसंचालन प्रा.प्रदीपकुमार धेंडगे यांनी केले.
या कलाप्रदर्शनात सुमारे ६०० चित्र आणि शिल्प कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. हे कला प्रदर्शनास २० जानेवारी पर्यंत खुले राहणार आहे. महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे. या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शिल्ड, रोख रक्कम आणि पुरुष असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.