...अन्यथा प्रजासत्ताक दिनी आत्मदहन

आंबा, काजू उत्पादक बागायतदार संघटनेचा इशारा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 15, 2025 17:57 PM
views 103  views

सिंधुदुर्गनगरी : 2023/24 च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळ पिक विमा योजनेतील सावंतवाडी निरवडे मंडळातील सहभागी विमाधारक शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा नुकसान भरपाई द्या अन्यथा २६ जनेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा सिंधुदुर्ग आंबा काजू उत्पादक बागायतदार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू उत्पादक बागायतदार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिव्या दिगंबर वांगणकर, प्रताप महादेव चव्हाण अर्जुनकृष्ण राऊळ, जालिंदर परब, शिवा नारायण तुळसकर, सुरज डिचोलकर सिताराम घोगळे, भरत सुभेदार, सुशांत गावडे  आदी पदाधिकारी उपस्थित होते

सन 2023/24 च्या रब्बी हंगामात आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रीलायन्स कंपनीकडे प्रधानमंत्री फळ पिक विमामध्ये सहभागी होऊन आंबा, काजु फळ पिकाचा विमा उतरविला. 2024 मध्ये जानेवारी ते मे दरम्यान अवकाळी पाऊस आणि एप्रिल-मे दरम्यान अति तापमान त्यातच फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेमळे गावातील शेतकऱ्यांचे आंबा, काजू हेच मुख्य पीक असल्याने आंबा, काजू हे उपजीविकेचे एकमेव आर्थिक साधन आहे. फळपिकाचा विमा उतरविला असल्याने आंबा उत्पादक शेतकरी विमा नुकसानी मिळणार यावर अवलंबून राहिला होता.

मात्र वर्ष उलटून गेले तरी अध्याप निरवडे मंडळातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फळपिक विमा नुकसानी जमा झालेली नाही. याबाबत कृषी विभागाने वेळोवेळी विमा कंपनीशी पत्र व्यवहार  करूनही विमा कंपनीने याची दखल घेतलेली नाही. 2023/2024 फळपिक विमा नुकसानी योग्य वेळेत न मिळाल्याने 2024/25 या चालू वर्षीच्या प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेत काही शेतकऱ्यांची सहभाग घेतला नाही. त्यामुळे सावंतवाडी-निरवडे मंडळातील काही शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ मंडळांमार्फत ५१ मंडळातील आंबा काजू बागायतदारांच्या खात्यात पिकविमा परतावा जमा केला हे कुठच्या निकषांच्या आधारे कंपनीने केले?  पाच मंडळातील बागायतदारांच्या खात्यात अद्यापपर्यंत पीकविमा परतावा जमा केला नाही हे कोणत्या GR च्या आधारे कंपनीने केले?याचा खुलासा संबंधित शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात द्यावा हि कंपनीची जबाबदारी आहे.

2023/24 ची फळपिक विमा नुकसान भरपाई 22 जानेवारीपर्यंत सावंतवाडी- /निरवडे मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यत  विमा रक्कम जमा  न झाल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी-निरवडे मंडळातील आंबा काजू उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आत्मदहन करू असा  इशारा देण्यात आला आहे.