
सावर्डे : आजच्या आधुनिक युगात "कृत्रिम बुद्धिमत्ता", विषयाचे महत्त्व सर्वव्यापी झाले असून जगात घडणाऱ्या विविध अत्याधुनिक व वेगवान बदल याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. कारण भविष्यात या विषयावरतीच मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळणे शक्य आहे. बदलत्या काळानुसार युवकांनी स्वतःमध्ये बदल करून अपेक्षित ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच, "विद्या सुर्वे स्मृती", "कृत्रिम बुद्धिमत्ता आव्हाने आणि संधी" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत व कार्यकारी संचालक अमित रानडे मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव महेश महाडिक, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सह्याद्री क्रीडा प्रबोधीनीचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिरुद्ध निकम, आयोजक दिनेश सुर्वे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुमित कुमार पाटील ,सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले, आयटीआयचे प्राचार्य उमेश लकेश्री, सर्व अध्यापक व बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जगात घडणाऱ्या अत्याधुनिक वेगवान बदलाबरोबरच या क्षेत्रात असणाऱ्या विविध रोजगारांच्या संधी याबाबत मार्गदर्शन करून कृत्रिम बुद्धिमत्ते समोरील आव्हानं या बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. त्यासाठी आपण योग्य कौशल्य विकसित केल्यास, याचा विधायक फायदा आपण घेऊ शकतो असे सांगितले. या प्रसंगी रानडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी विद्यार्थ्यांनी आता सज्ज झाले पाहिजे, याची माहिती विस्तृतपणे सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश गंगावणे यांनी केले.