विनयभंग प्रकरण ; रेहान लतीफ 2 वर्षांसाठी तडीपार

Edited by: लवू परब
Published on: January 08, 2025 21:06 PM
views 446  views

दोडामार्ग : ओळखीचा फायदा घेत रात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग करत तिला तसेच तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या साटेली- भेडशी येथील रेहान लतीफ या युवकाला दोन वर्षांसाठी तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे. सावंतवाडीचे प्रांताधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे, अशी माहिती दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

साटेली – भेडशी थोरले भरड येथील रेहान कमर लतीफ, ( वय २४ ) यास उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांचेकडील हद्दपार आदेशानव्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपार केले जात आहे. शिवाय हा हद्दपार करण्याचा आदेश दोन वर्षांकरिता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. रेहान लतिफ या युवकास अनेकदा पोलिसांकडून समन्स देण्यात आले होते. शिवाय त्याच्यावर येथील पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याच्या प्रवृत्तीत चांगला बदल होत नव्हता. तसेच तालुक्यात तो गुन्हे करतच होता. त्यामुळे त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुकावासियांकडून करण्यात येत होती.या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यातून लतिफवर तडीपार ची कारवाई करण्यात यावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार  प्रांताधिकारी सावंतवाडी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

लतीफ हा भेडशीतील थोरले भरड परिसरात राहत असून त्याचा गैरवर्तणूकीचा इतिहास आहे. पैशाचे आमिष म्हणून वापरून हिंदू महिला आणि मुलींना प्रेमसंबंधांसाठी प्रवृत्त केल्याचा आणि त्यांना बेकायदेशीर कामात टाकल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यापूर्वी, त्याने एका हिंदू मुलीला फसवून तिला आपल्या घरी आणले होते. स्थानिकांशी वाद होत असताना त्याने या मुलीचा ढाल म्हणून वापर केला. लतीफ रस्ता अडवणे, वाटसरूंना शिवीगाळ करणे, स्थानिकांशी भांडणे, गांजा विकणे आणि हिंदू महिला आणि मुलींना त्रास देणे यासारख्या विघटनकारी कार्यात गुंतलेला असल्याची माहिती आहे. त्‍याच्‍यावर आता तडीपाराची कारवाई केली आहे.