सावर्डे : संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लास्टिक मुक्तीचा संदेश संपूर्ण देशात पोहोचवण्याच्या उद्देशाने चला धावू प्लास्टिक मुक्तीसाठी हे घोषवाक्य घेऊन चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पवन तलाव चिपळूण येथे करण्यात आले होते.
या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील धावपटूंनी सहभाग घेतला होता. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या 32 धावपटूंनी सहभाग नोंदवून प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून स्पर्धा गाजवली. स्पर्धेच्या समारोपानंतर या परिसरात भरपूर प्रमाणात प्लास्टिक कचरा असल्याचे या धावपटूंच्या निदर्शनास आले. प्लास्टिक व स्वच्छतेविषयी प्रशालेमध्ये विद्यार्थी व पालकांच्यामध्ये महात्मा गांधी तीर्थ जळगाव यांच्या प्रेरणेने स्वच्छ्ता अभियान उपक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. या जनजागृतीचा परिपाक म्हणून या 32 खेळाडूंनी स्वयंप्रेरणेने या परिसरातील कचरा गोळा करून त्याची विलगीकरण केले व या स्पर्धेच्या घोषवाक्याचा आदर ठेवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश आपल्या कृतीद्वारे सर्व दूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कागदी कचरा, प्लास्टिक कचरा व टेट्रा पॅकचा कचरा असे विलगीकरण करून वेगवेगळा जमा केला आणि प्लास्टिक कचरा निसर्गमित्र चे अध्यक्ष भाऊ काटदरे यांच्याकडे रिसायकलिंग साठी सुपूर्त केला.स्वच्छतेची जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांनी मैदानावरील सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला.संदेश देत असताना स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली आणि संपूर्ण मैदान स्वच्छ केले. याबद्दल संघर्ष क्रीडा मंडळाच्या सर्व मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी व स्पर्धेचे राजदूत आयर्न मॅन डॉ.तेजानंद गणपते यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्याच्या या सामाजिक जणीवेबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूंचे कौतुक केले आहे.