शिवसैनिकांनी सामान्यांना केंद्र बिंदू मानून काम करावे : रुपेश राऊळ

आरवली येथील ठाकरे शिवसेना शाखेचा वर्धापनदिन
Edited by: दिपेश परब
Published on: December 28, 2024 20:25 PM
views 54  views

वेंगुर्ला : आरवली येथील ठाकरे शिवसेना शाखा ही कायमच सामाजिक बांधिलकी जपणारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन याठिकाणी शिवसैनिक काम करीत आहे. यापुढील काळात सुद्धा सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून काम करावे असे आवाहन ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले. 

     आरवली येथील शाखेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भूमिका दशावतार नाट्य मंडळाचे संचालक नितीन आशयेकर यांचा सत्कार श्री राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री राऊळ बोलत होते. वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री राऊळ म्हणाले, आरवली येथे गेली अनेक वर्षे शिवसेना शाखेच्या माध्यमातून काम सुरू आहे. येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संघटना मजबूत केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच अशाप्रकारेचे समाजोपयोगी कामे होऊ शकतात. त्यामुळे यापुढे सुद्धा असेच काम सुरू ठेवा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्या मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असेही आश्वासन दिले.