
कुडाळ : कोरो इंडिया संविधानवादी लोक चळवळ संस्था, ग्रामपंचायत नेरुर देऊळवाडा, यसार फाऊंडेशन, इकिगाई फाऊंडेशन, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा महिला विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर भारतीय स्त्रीमुक्ती दिन - स्त्री सन्मान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत नेरुर देऊळवाडा येथे सन्मान नारीचा जागर स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरुर सरपंच भक्ती घाडीगावकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कोरो इंडिया मुंबईचे नितीन कांबळे व अमोल पाटील हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच महिला पोलीस पाटील श्वेता मेस्त्री, सुवर्णा म्हाडदळकर, ग्रामपंचायत सदस्य रोशनी नाईक अनुजा नेरुरकर, विकास प्रबोधिनी संस्था अध्यक्ष अनुया कुलकर्णी, संगम प्रभाग संघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, जि. प. केंद्रशाळा नेरूरच्या प्रभारी मुख्याध्यापिका रश्मी राऊळ, चेंदवण उपसरपंच रोशनी नाईक, नेरुळ गावच्या पहिल्या महिला सरपंच अनन्या हडकर, कोकणकला विकास संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कासले, दीपक जाधव, सत्यवान तेंडुलकर , महिमा कदम, वासंती तेंडुलकर, सत्यवान भगत, नेरुर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक शिवदास मसगे , तसेच नेरूर गावातील सर्व ग्रामसंघ अध्यक्ष , सर्व अंगणवाडी सेविका, सर्व सी.आर.पी., आशाताई, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
सर्वप्रथम सावित्रीच्या ओवीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर सरपंच भक्ती घाडीगावकर, प्रमुख वक्ते नितीन कांबळे, अमोल पाटील आणि समाजसेविका विनया कुलकर्णी यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिलांना स्त्रियांचा अधिकार आणि स्त्रियांचा सन्मान कसा राखावा याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना कोकण विभाग प्रमुख अमोल पाटील यांनी असे प्रतिपादन केले की, "मुळात भारतीय संविधान व संविधानिक मूल्य माणसाला माणूस म्हणून जगायचे शिकवतात. माणसाच्या न्याय्य हक्काचे रक्षण करतात.एकेकाळी ज्या स्त्री चे समाजाचे माणूसपण नाकारले ,शिक्षण नाकारले तिची मर्यादा चूल व मूल येथे पर्यंत ठेवली.त्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळावा माणूस म्हणून जगता यावे यासाठी अनेक महामानव यांनी प्रयत्न केले.त्यामुळे आज सावित्रीच्या लाखो करोडो लेकी या शिक्षण घेत आहेत,नोकरी व्यवसाय करत आहेत व सन्मानाने आपले जीवन जगत आहे.पण आजही असंख्य स्त्रिया पुरुषसत्ताक वर्चस्ववादी मानसिकता याच्या शिकार होत आहेत. अनेक हिंसाचाराच्या बळी पडत आहेत. या मानसिकतेच्या जोखडीच्या बंधनातून त्यांना मुक्ती मिळावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. " तसेच कोरो मुंबई स्थित संस्था आहे. जी महाराष्ट्रतील सर्व विभागात अनेक संस्था संघटनेच्या माध्यमातून नेतृत्व विकासाचा कार्यक्रम राबवते.ज्याच्या माध्यमातून असंख्य नेतृत्व (लीडर) पुढे येतील जे आपल्या गावातील ,वाडी वस्तीतील वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करतील व त्याच्या निरसन करण्याकडे घेऊन जातील. अशी माहिती ही अमोल पाटील यांनी यावेळी दिली.
त्यानंतर संविधानवादी लोक चळवळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कृतिशील उपक्रम घेऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना आपली आई तसेच घरातील महिलांचा कसा सन्मान करावा याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजकांच्या वतीने नेरूर देऊळवाडा कार्यक्षेत्रातील विशेष काम करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये महिला पोलीस पाटील, गावच्या पहिल्या महिला सरपंच तसेच सीआरपी, ग्राम संघ अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच चेंदवण गावचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवणाऱ्या स्वराज उत्पादक संघाचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.