
सावंतवाडी : लहान मुलांना घेऊन दुकानात येऊन पैशांची मागणी करत असतानाच मुलांच्या माध्यमातून कपडे तसेच व पैशांची चोरी करणाऱ्या टोळक्याला दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडून सावंतवाडीतील एका व्यापाऱ्याने पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरुवातीला याबाबत नकार देणाऱ्या संबंधित परप्रांतीय महिलेने अखेर चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या तांड्यावर जाऊन बॅगेत लपवून ठेवलेला काही ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर समज देऊन त्यांना सोडण्यात आले.
कर्नाटक तसेच अन्य भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन आपल्या मुलाबाळांसह दारोदार फिरून भीक मागणाऱ्या काही महिलांकडून मुलांचा वापर करीत चोरी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील एका कापड दुकानात अशाच प्रकारे शिरून महिला काउंटरवर पैसे मागत असताना तिच्यासोबत असलेल्या एका तीन ते चार वर्षाच्या मुलाने कपडे चोरून पळ काढला. काही वेळानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आला. त्यानंतर पाठलाग करून त्याने संबंधितांना नगरपालिका कार्यालयासमोर पकडले. सुरुवातीला आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली न देता उलट रडारड करून नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेची शेवटी व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला मुलांसह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातही सुरुवातीला कोणतीही गोष्ट कबूल करायला तिने नकार दिला. मात्र, काही वेळानंतर तिने चोरीची कबुली दिली. चोरलेला ऐवज सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपडीत ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना गाडीत घालून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता सावंतवाडीत नाहीतर कुडाळ रेल्वे स्टेशनच्या परिसरात आपण राहत असल्याचे सांगितले. कुडाळ रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत पणे उभारलेल्या झोपड्यांच्या तांड्यात नेल्यानंतर बॅगेत लपवून ठेवलेला काही मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला. तर काही कपडे फाडून त्याची अंथरुणे केली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना कडक शब्दात समज देऊन सोडून दिले. लहान मुलांचा चोरीसाठी वापर करणाऱ्या या परप्रांतीय महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिला खरा मात्र यातून या लहान मुलांचे भवितव्य मात्र अंधारात असल्याचे दिसून आले. शिक्षणाच्या वयात चोरीचे बाळकडू पाजले जात असल्याने त्यांचे पुढील आयुष्य गुन्हेगारीकडे वळण्याची भीती यावेळी उपस्थित सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी संबंधित महिलेकडे या लहान मुलांना आपल्या संघटनेकडे द्या आम्ही त्यांच्या शिक्षणाची व संगोपनाची सोय करतो असे सांगितले मात्र त्यांनी मुलांना ताब्यात देण्यास नकार दिला. यावेळी रवी जाधव यांनी अशा मुलांच्या भवितव्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.