
सावंतवाडी : बांदा येथील सेवाभावी कै.डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्टमार्फत दिले जाणारे २०२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार कामळेवीर पूर्ण प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास अशोक गोठोसकर यांना जाहीर झाला असून आदर्श माध्यमिक शिक्षक म्हणून मंगेश नरेश कांबळी यांची निवड करण्यात आली आहे. तर नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना जाहीर झाला आहे. तर गुरूवर्य वि. न. नाबर पुरस्कार शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव-कणकवली हायस्कुलचे मुख्याध्यापक हनुमंत विष्णू वाळके यांना जाहीर झाला आहे. ५ जानेवारीला बांदा येथे पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
आदर्श प्राथमिक शिक्षक विलास गोठोसकर हे ग्रामीण भागातील मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून नेहमीच विद्यार्थी विकास हे एकच ध्येय समोर ठेवून कार्यरत असतात. कांदुळी सारख्या अतिशय ग्रामीण भागातील शाळेला लोकवर्गणीतून सुविधा उपलब्ध करून आयएसओ नामांकन प्राप्त करून दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांचे नियमित मार्गदर्शन करीत आहेत. मंगेश कांबळी हे गुरूवर्य अ. वि. जावडेकर विद्यालय शिरोडा या माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक असून मुलांच्या सर्वांगीण विकासाकरीता शाळेत विविध उपक्रम राबवून वर्ग अध्यापना बरोबरच विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत असतात. कांबळी हे सामाजिक बांधिलकीतून परिसरातील विविध शैक्षणिक ,सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. अशा या बहुगुणी शिक्षकाला आदर्श माध्यमिक शिक्षक म्हणून गौरविण्यात येणार आहे. रवी जाधव आणि त्यांचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांची समाजाप्रती असलेली आत्मियता आणि तळमळ यातून कोणत्याही वेळी धाऊन कोणतेही काम करण्याची तत्परता या गुणांमुळेच त्यांना (कै.) नारायण यशवंत तथा नाना तारी स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मार्च २०२४ च्या शालांत परीक्षेत बांदा केंद्रातून इंग्रजी, मराठी, विज्ञान व गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी आणि बांदा केंद्रातून बारावीत प्रथम आलेला विद्यार्थी यांचाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. जनसेवा निधी बांदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ३.३० वाजता पीएम श्री केंद्र शाळा बांदा नं. १ च्या सभागृहात संपन्न होणार आहे. बॅ. नाथ पै सेवांगण वेंगुर्लेचे अध्यक्ष तथा संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी शिक्षणप्रेमी व जनसेवा निधी बांदाचे चाहतावर्ग यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा निधी कडून करण्यात आले आहे.
तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श प्रशासक व थोर शिक्षण तपस्वी (कै.) वि. न. तथा तात्यासाहेब नाबर यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतील या उद्देशातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना गुरूवर्य तात्यासाहेब नाबर पुरस्काराने जनसेवा निधी बांदा तर्फे आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात येते. २०२४-२५ चा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हनुमंत विष्णु वाळके (शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव- कणकवली) यांना जाहीर झाला आहे. गेली सव्वीस वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत असून प्रशालेचा सतत अकरा वर्षे १०० टक्के निकाल देऊन शाळेच्या सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा माजी विद्यार्थी व समाजातील दाते यांच्या सहकार्यातून निर्माण केल्या आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बाह्य परीक्षा, विज्ञान प्रदर्शन आदी विविध उपक्रम राबवित आहेत. या शैक्षणिक कार्या सोबतच गावातील सामाजिक संस्थामध्ये बहुमोल योगदान व मार्गदर्शन करत आहेत.