
सावर्डे : विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करण्यासाठी विद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना संधी दिली जाते त्या संधीचा फायदा घेताना सकारात्मक भूमिका ठेवावी. विद्यार्थ्यांच्या यशस्वी जडणघडणीमध्ये पालकांचा मोठा हातभार असतो. पाल्ल्याच्या गुणात्मक प्रगती बरोबरच संस्कारक्षम जडणघडणीसाठी प्रशालेसह पालकांनी जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे कारण ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक विचार असणे आवश्यक आहे असे मत विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात विविध कथेंचा आधार घेऊन विचार बदलल्यास भविष्य कसे बदलते याबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ॲप डाऊनलोड करून परीक्षेसाठी आवश्यक ती सर्व माहिती पालकांनी प्राप्त करावी व विद्यार्थ्यांना प्रगतीमध्ये लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच इयत्ता दहावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा संपन्न झाली या सभेला 235 पालक उपस्थित होते.प्रास्ताविकामध्ये पालक सभेचे नियोजन विद्यालयांमध्ये का आवश्यक आहे याची थोडक्यात कल्पना अशोक शितोळे यांनी दिली. पालकांची भूमिका,विद्यालयातील विविध उपक्रम, ज्यादा सराव परीक्षा, उत्तरपत्रिका लेखन शिबिर यासंबंधी उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.इयत्ता दहावी वर्ग शिक्षकांनी वर्गवार पालक सभेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती दिली यामध्ये सर्व शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा वर्ग निहाय घेतल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.विद्यालयाच्या या पालक सभेला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे उपमुख्याध्यापक विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी वर्षा चव्हाण यांच्या आभार प्रदर्शनाने पालक सभेची सांगता झाली.