
सावंतवाडी : आठवडा बाजाराच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मुख्य रस्ता बंद केला जात आहे. त्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, विशेषतः शाळकरी मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गोदामाकडून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहावा. यासाठी योग्य त्या सूचना पालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना द्याव्यात अशी मागणी सावंतवाडी माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी केली आहे.
आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रस्त्यावरच दुकाने तसेच गाड्या लावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. काही व्यापाऱ्यांकडून उद्धट वागणूक दिली जात आहे. त्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी त्यांना जागेची आखणी करून द्यावी. आठवडा बाजार भरत असलेल्या ठिकाणी २०० मीटरवर मिलाग्रीस व मदर क्चीन अशा दोन शाळा आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय आहे तसेच परिसरात पंचायत समिती तहसीलदार वनविभाग व अन्य महत्त्वाची कार्यालय आहे. त्यामुळे ये-जा करताना लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबतच्या अनेक तक्रारी मुलांच्या पालकांकडून व नागरिकांकडून प्राप्त झाल्यानंतर अँड. नाईक यांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडीचा आठवडा बाजार गोदामाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर भरत आहेत. आमचा बाजार भरवण्यास विरोध नाही. परंतु, त्या ठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायिक रस्ता दोन्ही साईडने फांद्या, बॅरिकेट आदी साहित्य लावून बंद केला जात आहे. तर काही व्यावसायिक वाहतुकीला अडथळा होईल अशी दुकाने मांडत आहे. त्यामुळे संबंधितांना याबाबत योग्य ती कल्पना द्यावी व त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे त्यांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची आपण लवकरच भेट घेणार आहे असे अँड. नाईक यांनी सांगितले.