किशोर वालावलकर - भाऊसाहेब गोसावी यांना काव्य पुरस्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2024 11:39 AM
views 195  views

सावंतवाडी : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या प्राचार्य शंकरराव उनउने काव्यलेखन स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक किशोर अरविंद वालावलकर यांच्या 'ईस्माईल ठाकूर कुरले गरयता' या मालवणी बोली भाषेतील कवितेला विशेष उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचा काव्य पुरस्कार तर कारिवडे येथील कवी, लेखक व लोकसाहित्य अभ्यासक प्रा. भाऊसाहेब गोसावी यांच्या 'निमो' या मालवणी कवितेला पाचव्या क्रमांकाचा काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहे.         

मराठी बोली व भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी प्राचार्य शंकरराव उनउने यांच्या नावे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने मराठी, कोकणी बोलीभाषेतील या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता मागविण्यात आल्या होत्या. देशातील पहिल्याच ऐतिहासिक ठरेल अशा बोली भाषेतील या काव्य स्पर्धेत एकूण १२३ कवी व कवयित्री सहभाग घेत १८६ कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या. प्रा. भाऊसाहेब गोसावी यांची  निमो ही मालवणी कविता सध्याच्या मुलांच्या लग्न न होण्याच्या समस्येवर असून निमो राहिल्यांने समाजात, कुटुंबात काय समस्या असतात यावर प्रकाश टाकणारी आहे. प्रा. गोसावी हे कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातील मराठीचे निवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांचे अनेक कवितासंग्रह, कथा, नाटक व संशोधनपर लेखन प्रकाशित झाले असुन त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.  किशोर वालावलकर आणि प्रा. भाऊसाहेब गोसावी  यांच्या पुरस्कार प्राप्त कविता "बोलीगंध" या प्रातिनिधिक कविता संग्रहात प्रकाशित होणार आहे.

येत्या जानेवारी महिन्यात सातारा येथे होणाऱ्या प्राचार्य उनउने बोलीभाषा काव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात किशोर वालावलकर आणि प्रा. भाऊसाहेब गोसावी  यांना मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे असे या स्पर्धेचे समन्वयक  प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी कळविले आहे. किशोर वालावलकर आणि प्रा. भाऊसाहेब गोसावी यांना हा काव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबददल त्यांचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.