कवी सफरअली इसफ यांना सम्यक संबोधी काव्य पुरस्कार जाहीर

सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम,सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती
Edited by:
Published on: December 17, 2024 12:30 PM
views 231  views

कणकवली : सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्यावतीने यावर्षीपासून देण्यात येणारा सम्यक संबोधी काव्य पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या बहुर्चित 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा रमेश साळुंखे (कोल्हापूर) आणि प्रसिद्ध कवयित्री तथा अभिनेत्री कविता मोरवणकर (मुंबई) यांच्या परीक्षण समितीने सफरअली इसफ यांच्या 'अल्लाह ईश्वर ' या काव्यसंग्रहाची सदर पुरस्कारासाठी निवड केली  असल्याची माहिती सिंधुदुर्ग सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम आणि सचिव सूर्यकांत साळुंखे यांनी दिली.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या  50 काव्यसंग्रहांमधून अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली. परिवर्तन विचार केंद्रस्थानी ठेवून सम्यक संबोधी सिंधुदुर्ग या साहित्य संस्थेची यावर्षी स्थापना करण्यात आली. तळकोकणात अनेक साहित्य संस्था कार्यरत आहेत. त्यांना पूरक काम करण्याच्या उद्देशाने कार्यरत झालेल्या या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पहिल्याच सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी उत्तम आणि वेगळी कविता लिहूनही अशी चांगली कविता लोकांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या कवी सफरअली इसफ यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार ही आमच्या संस्थेच्या दृष्टीनेही सन्मानाची घटना असल्याचे श्री कदम आणि श्री साळुंखे यांनी स्पष्ट केले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या कणकवली येथे होणाऱ्या पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनात सदर पुरस्काराने कवी सफरअली इसफ यांना गौरविण्यात येणार आहे. 'अल्लाह ईश्वर ' मधील कविता आजच्या जातीय धार्मिक ध्रुवीकरणाकडे निर्देश करताना माणूस कसा विभागला गेला आहे. याचचे भेदक वास्तव सांगते. माणसाचा माणसावरचा विश्वास उडून जावा इतका माणूस अधिक वर्चस्ववादी झाला आहे. या वर्चस्ववादी वृत्तीचा बळी अल्पसंख्यांक गट ठरत असून या सगळ्याची चिकित्सक मांडणी करताना या कवितेत कुणाबद्दलही कटुता नाही हे या कवितेचे सर्वात महत्वाचे मोल आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.