
सावंतवाडी : कुणकेरी लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात २७ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला रामचंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत प्रारंभ झाला. दत्त जयंती दिवशी शनिवारी १४ डिसेंबरला या पारायणाची सांगता होणार असून दररोज पहाटे अभंग गाथा त्यानंतर काकड आरती, सकाळी श्री दत्त - महाराज पूजन सोहळा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन तसेच पारंपरिक भजने होणार आहेत.
यावेळी मनोरमा सावंत, प्रकाश केळुस्कर, उदय सावंत, प्रिती सावंत, पांडुरंग सावंत, गुरुनाथ पुजारी, रामचंद्र बावकर, चोपदार मधुकर कडव, प्रमिला सावंत, उज्वला सावंत, पुष्पलता दळवी, मनसे जिल्हाध्यक्ष कैतन सावंत आणि वारकरी व भक्त उपस्थित होते. सोमवारी कुणकेरी वारकरी संप्रदाय भजन मंडळ, मंगळवारी सांगेली काडसिद्धेश्वर महाराज भजन मंडळ यांचे भजन पार पडले.
बुधवारी श्री दत्त नामस्मरण १००० जप करण्यात आला. उद्या गुरूवारी शिरशिंगे वारकरी संप्रदायचा हरिपाठ, शुक्रवारी निळेली वारकरी संप्रदाय हरिपाठ तर शनिवारी १४ डिसेंबरला आंबेगाव विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. या पारायणानिमित्त मंदिरात कागदाच्या लगद्यापासून साकारलेली विठ्ठलाची मूर्ती खास आकर्षण ठरली होती. दत्त जयंतीनिमित्त शनिवारी काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी बारा वाजता दत्त जन्मोत्सव दिंडी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.