साग - आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची चौकशी व्हावी

नगरसेवक विलास कुडाळकर यांचं तहसीलदारांना निवेदन
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 11, 2024 18:22 PM
views 420  views

कुडाळ : येथील जुना जिल्हाधिकारी बंगला व सध्याचे तलाठी कार्यालय येथील साग व आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार, कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ येथील जुना मा. जिल्हाधिकारी बंगला व सध्या तलाठी कार्यालय असलेल्या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयाची इमारत उभारण्यात येत आहे. या परिसरामध्ये इमारतीचे काम करण्यापूर्वी असलेली साग व आकेशियाची झाडे तोडण्यात आली होती. आणि ही तोडलेली झाडे या परिसरात ठेवण्यात आली होती. शनिवार ७ डिसेंबर २०२४ रोजी ही झाडे संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी घेऊन नेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणाची आपल्याकडून सखोल चौकशी व्हावी तसेच ही इमारत उभारण्यासाठी व झाडे तोडण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. अशी माहिती मिळत आहे. तरी या प्रकरणाचा आपल्याकडून योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी कुडाळ तहसीलदारांकडे केली आहे.