
सावंतवाडी : ह्रदय शस्त्रक्रियेचे वेळी एका महिलेला रक्ताची तातडीची गरज असताना केवळ एका काॅलवर अवघ्या चार तासांच्या अवधीत एस् एस् पी एम् रक्तपेढीमध्ये जाऊन पाच रक्तदात्यांनी मोलाचे रक्तदान करीत एका महिलेचे प्राण वाचविले. ऑन काॅल रक्तदाते संस्थेच्या या रक्तदात्यांचे संबंधित महिलेच्या रुग्णांनी तसेच रुग्णालय प्रशासनाने देखील आभार मानले.
सावंतवाडी गरडनाका येथील लता पाटणकर या चाळीस-बेचाळीस वर्षीय भगिनीला एस एस पी एम हाॅस्पिटलमध्ये तपासणीकरीता गेली असता तिला ह्रदय शस्त्रक्रियेची तातडीची आवश्यकता असल्याचे डाॅक्टरांच्या लक्षात आले. वस्तुतः ह्रदय शस्त्रक्रियेच्या वेळी पाच ते सहा युनिट फ्रेश रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी सिंधुदुर्ग आरोग्य विभागात कार्यरत असलेले नियमित ऑन काॅल रक्तदाते संजय नाईक यांच्यापर्यंत ही माहिती आली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ती माहिती ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या समूहावर पाठविली.
त्यानंतर ऑन काॅल रक्तदाते संस्थेमार्फत सदर पोस्टचा पाठपुरावा करत असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरुवातीला सावंतवाडी पंचायत समितीतील वरीष्ठ वित्त अधिकारी तथा आमच्या नियमित ऑन काॅल रक्तदात्या अनिता फाले आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक फाले या मायलेकरांनी संध्याकाळीच साडेसातच्या दरम्याने रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
त्यानंतर रात्रौ अकरा वाजता " ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग" चे कार्यकारिणी सदस्य तथा नियमित रक्तदाते दिनेश गावडे यांनी आपले चिरंजीव आर्य गावडे तसेच अमित बांदेकर व रोहन बांदेकर हे दोघे बंधू या सर्व रक्तदात्यांना घेऊन एस् एस् पी एम् रक्तपेढी गाठली. तिघाही रक्तदात्यांनी रक्तदान केले. आर्य गावडे याने तर केवळ एकोणवीसाव्या वर्षी हे दुसरे रक्तदान केले. यासाठी संजय नाईक (कोलगाव) व दिनेश गावडे (निरुखे) यांनी विशेष प्रयत्न केले.
रक्ताची तातडीची गरज असताना एखादी अनिता फाले आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक या दोघांनी एकाचवेळी रक्तदान करणे, तसेच त्याचवेळी अमित व रोहन बांदेकर या सख्ख्या बंधुंनी एकाचवेळी रक्तदान करणे आणि दिनेश गावडे या रक्तदात्यांनी आपले चिरंजीव आर्य गावडे यांना स्वतः रक्तदानासाठी घेऊन जाऊन रक्तदान करवून घेणे हे आपले कर्तव्य समजत एक अनोखा पायंडा पडला. सदर महिलेला रक्तदान करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन कुटुंबांनी एकत्र येत सहभाग घेतला, ही विशेष उल्लेखनीय बाब ठरली.
समूहावर पोस्ट येताच तातडीने रक्तदान करणार्या रक्तदात्यांचे तसेच ही पोस्ट पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार्या सर्वांचे आणि ऑन काॅल रक्तदाता संस्थेचे नातेवाईकांनी आभार मानले. अशा अनेक गुंतागुंतीच्या पेशंटसाठी तसेच बायपास शस्त्रक्रियेच्या पेशंटसाठी रक्तदाते पाठवून पेशंटचा बहुमोल जीव वाचविणे हे आता " ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग" साठी नित्याचेच झाले आहे. केवळ रक्तदात्यांच्या जीवावरच ही संस्था रुग्णांचे बहुमोल जीवन सुखकर करीत आहे. या रक्तदात्यांच्या आम्ही सर्वचजण कायमच ऋणात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तथा सेवा निवृत्त पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस यांनी म्हटले आहे.