
कणकवली : फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभा शाखा फोडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने फोडाघाट येथील सिद्धार्थ नगर मधील नालंदा बौद्ध विहारात 6 डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाणदिन पार पडला.
कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष सुचिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सूत्र संचालन प्रा. संतोष आखाडे यांनी केले. कार्यक्रमात बोलताना मंडळाचे माजी अध्यक्ष संजय तांबे म्हणाले की, अजून ही काही लोकांचा गैरसमज आहे की डॉ. आंबेडकर केवळ दलितांचे, वंचिताचे आहेत. त्यांनी केवळ दलित समाजाच्या उद्धाराचे कार्य केले परंतू डॉ. आंबेडकरांचे कार्य हे केवळ दलित समाजा पुरतेच मर्यादित नव्हते तर ते अखिल भारतीय मानव जातीच्या उद्धरासाठी होते. म्हणून ते नेहमीच म्हणत की प्रथम मी भारतीय आहे व अंतिम ही भारतीय आहे. म्हणूनच त्यांनी मूळ भारतीय असणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून दलितांना व बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याची उर्मी दिली. त्यांचे कार्य हे हिमालया पेक्षा उत्तुंग आहे. व सागरा सारखे अथांग आहे.
कार्यक्रमात आभार माजी अध्यक्ष संतोष कदम यांनी मानले. कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या विषयी सुचिता जाधव, जयवंत जाधव, प्रा. संतोष आखाडे व मिलिंद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मंडळाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.