
मंडणगड : दहागाव येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, या विद्यालयामध्ये, आज 6 डिसेंबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी बाबासाहेबांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवन ज्योत मालवली आहे. मात्र त्यांनी चेतवलेली ज्ञानज्योत सदैव तेवत राहील. विद्यार्थ्यांनी महामानवांचा आदर्श घेतला पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील , त्या परिस्थितीला त्यांनी आपल्या मार्गातील अडचण होऊ न देता, त्यावर मात केली. आणि ते जीवनात यशस्वी झाले. आज उभ्या विश्वामध्ये बाबासाहेबांचा लौकिक आपल्याला पाहण्यास मिळतो. विद्यार्थ्यांनी या महामानवाचा आदर्श घ्यावा आणि अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक मनोज चव्हाण, विक्रम शेले, जितेंद्र कलमकर त्याचबरोबर शिक्षिका विनया नाटेकर, अनिता पवार तसेच क्लार्क कृष्णा दळवी, भाई गुडेकर व गौड भाऊ तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.