देवगड तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत संजीव राऊत प्रथम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 06, 2024 15:51 PM
views 116  views

देवगड : देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने 'जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती' या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वाडा येथे साहित्यिका अनुराधा दीक्षित व ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी त्यांनी जयवंत दळवी हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. ते मराठीमध्ये कथाकार, कादंबरीकार , आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. पण त्याचबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांच्या कादंबरीवर चित्रपट निर्मितीही करण्यात आली. मराठीमध्ये त्यांनी अनेक अजरामर नाटके लिहिली. त्यात त्यांनी कौटुंबिक गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. असे हे साहित्यातील,नाट्यसृष्टीतील एक दिग्गज नाव होते.असे त्या म्हणाल्या.यावेळी व्यासपीठावर उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ.भाई बांदकर, माजी अध्यक्ष शसागर कर्णिक आणि प्रकाश पंडित उपस्थित होते. डॉ. भाई बांदकर  यांनी स्पर्धकांना वाचक स्पर्धेमध्ये भाग घेताना  संवाद, देहबोली, पाठांतर, हावभाव यांचे महत्त्व विशद केले. आणि स्पर्धेचा विषय आकलन करून प्रभावीपणे मांडण्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. भाई बांदकर यांनी दीक्षित व पंडित आणि श्री कर्णिक यांचे स्वागत केले.

या स्पर्धेमध्ये श्री संजीव राऊत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय कु. गायत्री मेस्त्री आणि तृतीय कु. अनुष्का धुरी यांना मिळाले. सौ. अनुराधा दीक्षित आणि श्री प्रकाश पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ग्रंथपाल श्री प्रशांत बांदकर यांनी केले आणि शेवटी मान्यवरांचे , स्पर्धकांचे व उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले.