संत तुकाराम, शिवराय डॉ पंजाबरावांच्या समाजक्रांतीचे प्रेरणास्त्रोत

डॉ.राजेश मिरगे यांचं प्रतिपादन
Edited by: मनोज पवार
Published on: December 06, 2024 15:36 PM
views 118  views

चिपळूण : संत तुकाराम छत्रपती शिवराय  या दोन महान विभूतींच्या प्रेरणेतूनच शेती,शेतकरी आणि बहुजन वर्ग हाच डॉ पंजाबरावांच्या कार्याचा रोडमॅप राहिला आहे असे प्रतिपादन शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील मराठी विभागप्रमुख डॉ. राजेश मिरगे यांनी केले. लोकमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून सावर्डे ता.चिपळूण येथील कला व विज्ञान महाविद्यालयात विशेष अतिथी व्याख्यानाप्रसंगी "लोकमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख समग्र समाजक्रांती: आणि भारतीय संविधानातील त्यांचे योगदान" याविषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य टी .वाय.कांबळे सर यांनी प्रमुख अतिथी शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एल. कुलट आणि प्रमुख वक्ते डॉ. राजेश मिरगे सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मनोगतामध्ये डॉ. मिरगे म्हणाले तत्कालीन अठरापगड बहुजन समाजातील लोकांच्या मानगुटीवर धर्मातील रूढी परंपरा कर्मकांडे यांचे गारूड रूतून  बसल्यामुळे या बहुजन समाजाचे जीवन अत्यंत कष्टप्रद दुःखी व दयनीय बनले होते.म्हणून धर्म हा माणसासाठी आहे की, माणसासाठी धर्म आहे? याची चिक्कीसा करण्याकरिता त्यांनी इंग्लंडमधील एडनबरो विद्यापीठातून 'वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास 'या विषयातून संशोधन करून धर्माची चिकित्सा केली. त्या काळात धर्मावर सखोल चिंतन व चिकित्सा करणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे भारतातील पहिली व्यक्ती होते. जातीविरहित समाजव्यवस्था,शिक्षित समाजव्यवस्था निर्माण करण, मागास आणि वंचितांचा विकास हेच डॉ. पंजाबरावांचे स्वप्न होते. देवाधर्माची चिकित्सा करून आधुनिक नवपरिवर्तनवादी प्रोग्रेसिव विचार मांडणारे डॉ.पंजाबराव देशमुख एक कृतिशील व्यक्तिमत्व होते. पंजाबरावांचे संविधानातील योगदानासंदर्भात प्रा. हरी नरके यांचा दाखला देत डॉ. मिरगे पुढे असेही म्हणाले राज्यघटना समितीतील महत्त्वाचे योगदान खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेबांनंतर डॉ. पंजाबरावांना जाते. कॉन्स्टिट्यूशनल असेंबली डिबेटमध्ये डॉ. पंजाबरावांनी ३५० वेळा सहभाग घेतला. यावेळी कुणबी शेतकऱ्यांच्या हक्कासंबंधी प्रश्न, नागरिकत्वाची तरतूद, राष्ट्रपतीच्या पात्रतेबद्दल तरतुदी, कार्यपालिका व न्यायपालिका त्यांचे स्वतंत्र अस्तित्व, संसद सदस्यांचे विशेष अधिकार, ,राज्यपालाचे अधिकार,मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य, आणि राष्ट्रध्वजाचा रंग व राष्ट्रभाषा कोणती असावी, या महत्वपूर्ण विषयावर संविधान सभेत वादविवाद केलेला आहे. घटनेची भाषा संदिग्ध नसावी असे पंजाबरावांचे स्पष्ट मत होते. या सर्वच योगदानाबद्दल डॉ. पंजाबराव हे खऱ्या अर्थाने लोकमहर्षी ठरतात.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य.डॉ. ए.एल. कुलट सरांनी डॉ. पंजाबरावांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्यावतीने महाविद्यालयास डॉ.पंजाबराव यांची प्रतिमा आणि त्याच्या कार्यावर आधारित ग्रंथ भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य टी वाय कांबळे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन प्रा. सुनील जावीर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक ,विद्यार्थी व कर्मचारी वर्ग आणि इतर महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.