
सिंधुदुर्गनगरी : धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक आणि परशुराम मधुकर नाईक या दोन्ही भावांना दोषी धरून येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
जमीनीच्या असलेल्या वादातून आकेरी येथील लक्ष्मण नाईक वय वर्ष ४० आणि परशुराम नाईक ३३ यांनी रुपेश पाटील यांच्यावर कांबळेविर येथील बाजारपेठेत धारदार शस्त्राने वार केले होते. यामध्ये ते जबर जखमी झाले होते. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी संशयित दोन्ही आरोपींवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या खटल्याच्या सुनावणीत भादवी कलम ३०७ अन्वये प्रत्येकी ५ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंड, भादवी कलम ५०४ नुसार प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड तर भादवी कलम ३०६ अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.