सावंतवाडी : येत्या पंधरा ते वीस दिवसात सावंतवाडी जिमखाना मैदानाच्या खेळपट्टीसह सपाटीकरण करून मैदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिल्याची माहीती माजी क्रीडा सभापती अँड परिमल नाईक यांनी दिली. मैदानाच्या दुरावस्थेकडे अँड. नाईक यांनी लक्ष वेधत प्रशासनाला धारेवर धरलं होतं. यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत मैदान सुस्थितीत आणण्याची ग्वाही नगरपरिषद प्रशासनाने दिली.
या पूर्वी मैदानाच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून क्रिकेट व क्रीडा प्रेमीच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा अँड. परिमल नाईक यांनी दिला होता. यानंतर मुख्याधिकारी यांच्या दालनात मैदानविषयक भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या पंधरा ते वीस दिवसात सर्व अडथळे दूर करून प्राधान्याने खेळपट्टी सह मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्याधिकारी यांनी दिली. यावेळी अँड. परिमल नाईक यांच्या समवेत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी बाळ चोडणकर, राजन नाईक, बाबल्या दुभाषी यांच्या सहित क्रीडाप्रेमी उपस्थित होते.