सावंतवाडी : माध्यमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आज गुरूवार ५ डिसेंबर २०२४ रोजी अचानक धिसडघाईने आयोजित केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे समायोजन हे बेकायदेशीर असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनांना विश्वासात घेतले नाही. तसेच संस्थाचालकांनाही विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही माध्यमिक शिक्षण विभागाच्या या मनमानी व एककलमी कारभाराचा निषेध करत असून हे समायोजन तत्काळ माध्यमिक शिक्षण विभागाने थांबवावे. अन्यथा हे समायोजन उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे.हे समायोजन माध्यमिक शिक्षण विभागाने लादण्याचा प्रयत्न केला तर माध्यमिक शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिक्षक, पालक,विद्यार्थी यांच्यासह थेट रस्त्यावर उतरून जनआंदोलन पुकारावे लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर आणि कार्यवाह नंदन घोगळे यांनी दिला आहे.
हे आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.याबाबत लेखी पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू,राज्याचे कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार ना.गो.गाणार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे,महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांना देण्यात आले आहे. तर याची प्रतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार यांनाही देण्यात आली आहे. या समायोजनाला विरोध दर्शविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर शिक्षक संघटनानी सुद्धा सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक परिषदेने केले आहे.
जि.प.चा माध्यमिक शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवत असल्याने हे समायोजन तत्काळ रद्द करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेने रात्री उशिरा फोनकरून लक्ष वेधले.याबाबत कोणत्याही संघटनाना विश्वासात घेतले नसल्याचे दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.अचानक काल ४/१२/२०२४ चे समायोजन संदर्भातील पत्र व्हाॅटसअप वर व्हायरल होत असलेले हे बेकायदेशीर पत्र आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार याबाबत केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी केसरकर यांनी आपण माध्यमिक शिक्षण विभागाशी याबाबत चर्चा करून बोलणार असल्याचे आश्वासन शिक्षक संघटनांना दिले.संच मान्यता 2023- 24 प्रमाणे अतिरिक्त शिक्षकांची यादी आज अचानक प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर ०५/१२/२०२४ रोजी या शिक्षकांचे समायोजन आयोजित केल्याचेही काल व्हाॅटसअप व्हायरल होत असलेल्या पत्रावरून समजत आहे.ही प्रक्रिया अत्यंत धिसडघाईने, घाईगडबडीने व सदोष पद्धतीने राबवली जात आहे .अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांची संख्या ही लक्षणीय आहे. संबंधित शाळांच्या बिंदू नामावली तपासून त्यानंतरच आपण अतिरिक्त शिक्षकांची यादी अंतिम करायला हवी होती.तसेच ज्या शाळातील शिक्षकांनी आपली तक्रार नोंदवलेली आहे. त्या तक्रारीचा निर्णय करण्यापूर्वीच समायोजन करणे हे योग्य नाही.अतिरिक्त शिक्षकांच्या मध्ये इयत्ता ५ वी या सर्वगातील शिक्षकांची संख्या सर्वात जास्त आहे.इ यत्ता पाचवीला अध्यापन करणारे शिक्षकांची नियुक्ती एच. एस.सी.डी.एड असली तरी आता त्यांची शैक्षणिक अर्हता बीए. बीएड आहे.अशा शिक्षकांचे समायोजन सहा ते आठ या गटात करावे. तसेच अतिरिक्त शिक्षक समायोजनासाठी शासनाच्या प्रचलित शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.या समायोजनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा तीव्र विरोध आहे. तरी हे बेकायदेशीररीत्या राबवित असलेले समायोजन तत्काळ थांबवावे अशी मागणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने करत यावर जोरदार आवाज उठवला आहे.
समायोजन होण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कोणत्याही शिक्षकांनी उपस्थित राहू नये. तसेच समायोजन प्रक्रियेस सामोरे जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर आणि कार्यवाह नंदन घोगळे यांनी केले आहे. या समायोजन प्रकियेस शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर, सी.डी.चव्हाण, प्रशांत आडेलकर, समिर परब, आकाश पारकर, अध्यापक शिक्षक संघाचे अजय शिंदे, विजय मयेकर, कास्ट्राईब संघटनेचे आकाश तांबे, शिक्षक सेनेचे कमलेश गोसावी, शंकर तामाणेकर यांनी विरोध दर्शविला आहे.