वैभववाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीचे उपक्रम स्तुत्य आहेत. आमचा गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात विद्यार्थ्यांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. यासाठी स्वच्छतेला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. दर्जेदार शिक्षण घेऊन आपण उच्च ध्येय गाठले पाहिजे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी केले. करुळ ग्रामपंचायत यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय करूळ प्रशालेला संगणक संच व प्राथमिक शाळेसाठी हार्मोनियम प्रदान करण्यात आला.यावेळी श्री.जंगले बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच नरेंद्र कोलते, पंचायत समितीचे अधिक्षक मनोज सावंत, मुख्याध्यापक दीपक घाटगे, उपसरपंच सचिन कोलते, पोलीस पाटील सागर पवार, उदय कदम, वि.मं. करुळ गावठण अ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साची कोलते, शिक्षक विलास गुरव, विकास नर, श्री गोरे, श्री. खडसे, वैभव पाटील, श्री कानडे, अर्चना पाटील, दत्ताराम पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी नरेंद्र कोलते, मुख्याध्यापक दीपक घाटगे, मनोज सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी तर आभार वैभव पाटील यांनी मानले. यावेळी माध्यमिक व प्राथमिक प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.