
वैभववाडी : आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून दिला जाणा-या "वसंत स्मृती" आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एडगाव येथील ज्योती जयवंत पवार यांची निवड झाली आहे. सिंंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती कै.वसंत डावखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार निरंजन डावखरे यांच्यावतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याकरिता या दोन्ही जिल्ह्यांतील प्रयोगशील शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील एडगाव येथील शिक्षिका सौ.पवार यांची निवड करण्यात आली आहे. सौ.पवार ह्या सध्या तालुक्यातील करुळ गावठण येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
गेली अनेक वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यासाठी त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन आम.डावखरे यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.