मुंबई : चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेने 'सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक या स्वीकृत कार्यक्षेत्रांत विविधांगी उपक्रमांद्वारा सातत्यशीलतेने कार्यप्रवण असणारी अग्रणी संस्था' अशी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. १९७४ साली मुंबईत स्थापन झालेल्या या संस्थेने याच वर्षी आपल्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुंबईसह आपल्या डोंबिवली, चिपळूण, पुणे, रत्नागिरी व गोवा या सहाही ठिकाणी शाखा स्थापनेसाठी पायाभूत स्वरुपाची मदत करणा-या चतुरंग शिल्पकारांप्रती कृतज्ञता सोहळ्यांचे आयोजन केले होते. या खेरीज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा दोन दिवसीय भव्य स्वरुपातील स्वतंत्र सांगता सोहळा, ११ क्षेत्रातील नामवंत गुणवंत दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्माना'ने जाहीर गौरव करीत, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गेल्या दि. २८ व २९ सप्टेंबर २०२४ रोजी दादर माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात मोठ्या दिमाखात साजरा केला.
सुरुवातीपासूनच चतुरंगने कोकण खेड्यांतील शाळांना यथाशक्ती मदत करण्यासोबतच तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसही हातभार लावावा या विचाराने कोकण हे आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र निश्चित केले होते. मूळचे कोकणातील, रत्नागिरीमधील तळमळीचे व विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय स्व.एस.वाय.गोडबोले सरांच्या प्रेरणेने व शुभाशीर्वादाने १९८५-८६ सालापासून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर विविध अभ्यासवर्गांची सुरुवात झाली. सुरुवातीला आठवड्याभरासाठी असलेल्या या अभ्यासवर्गांची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर पुढे अधिक कालावधीच्या निवासी स्वरुपाच्या अभ्यासवर्गांच्या नियोजनाची संकल्पना कार्यान्वित झाली व १९९७ पासून चिपळूणपासून बत्तीसेक किलोमीटरवरील सावर्डे फाट्यापासून आत असलेल्या वहाळ गावातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत निवासीवर्गाचे आयोजन सुरु झाले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. सदानंद काटदरे सर व त्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वहाळकर ग्रामस्थ यांचे सर्वतोपरी सहकार्य यासाठी चतुरंगला लाभले आणि आजतागायत लाभते आहे. आणि त्यामुळेच २८ वर्षे सातत्याने (कोरोनाकाळाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता) या निवासी वर्गाचे आयोजन वहाळ येथे होत आहे. आजपर्यंत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सुमारे १७५० ते १८०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या वर्गाचा लाभ घेतला आहे.
यंदा रविवार दि.२७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झालेला १६ दिवसांचा हा निवासी अभ्यासवर्ग गेल्या २७ वर्षांप्रमाणे याही वर्षी सुविहितपणे संपन्न झाला. वर्गाचा सांगता समारोप सोहळा सोमवार दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी वहाळ शाळेच्या भव्य सभागृहात भावुक आणि उद्बोधक वातावरणात पार पडला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील २३ शाळांतील ५४ निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या वर्गात सहभाग घेतला. यावर्षी मुलींची संख्या लक्षणीय होती. ३७ विद्यार्थिनी व १७ विद्यार्थी वर्गात होते. या ५४ विद्यार्थ्यांबरोबरच चतुरंगच्या आणखी एका अभ्यासवर्गाचे (निर्धार निवासी अभ्यासवर्गाचे) विद्यार्थी-विद्यार्थींनीही या दिवाळीसुट्टीतील वर्गात प्रतिवर्षी सहभागी असतात. दोन्ही वर्गातील मिळून एकूण ८६ मुले-मुली दिवाळी सुट्टीत एकत्र होती. (३०मुले व ५६ मुली). मुंबई, पुणे, रत्नागिरी, चिपळूण येथील त्या त्या विषयातील वैदेही दफ्तरदार, संजय जोशी, पूर्वा चव्हाण, राजेश आयरे, नेत्रा चितळे, यशवंत वाकोडे, प्रशांत गावकर, प्रीती जोशी, डॉ. मैत्रेयी पटवर्धन, सुनील पांचाळ, अशोक परांजपे, ईशा दंडवते, दीपक मराठे, नंदू मर्डी, माधुरी जोशी, भरत इदाते, विभावरी दामले, भिवाजी मडके, शरद शिंपी, रजनी म्हैसाळकर, मानसी पेढांबकर, गौरी बापट, पूजा टिकेकर, अमेय गोडबोले.... अशा २४ विषयनिहाय अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकांनी अध्यापनात योगदान दिले. येणा-या शिक्षकांचीही निवास व्यवस्था तेथेच असल्याने अध्यापन काळाव्यतिरिक्तही शिक्षक उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना '२४ तास शिक्षकांच्या सानिध्यात' याचा लाभ घेता आला...
दिवसभरात ९.३० तासांच्या अभ्यासासोबत सुमारे ७ तासांची प्रातःस्मरण, वॉर्मिंग अप, योग प्रकार, सूर्यनमस्कार, योगासने, ओंकार साधना, विविध मैदानी खेळ, सामुहिक खेळगाणी, करमणूक, चिंतनयोग, वैचारिक गप्पागोष्टी, अभ्यासेतर व्याख्याने.... अशी संमिश्र आणि वैविध्यपूर्ण दैनंदिनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आंखलेली होती. आणि सर्व विद्यार्थ्यांनीही या सर्व गोष्टीत अतिशय उत्साहाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासासाठी या वर्गात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आणि याचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रांतील नामवंताच्या / विचारवंतांच्या उद्बोधक , मार्गदर्शनपर व्याख्यान सत्रांचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून प्रस्तुत निवासी वर्गाचे उद्घाटनही निवासी वर्गातीलच उच्चशिक्षित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते करुन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला जातो. यावर्षी चतुरंगच्या २००७ च्या निवासी वर्गातील विद्यार्थी व सध्या M.D. (Anthesiology) ही मेडिकल व्यवसायातील उच्चपदवी संपादन करुन डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ.हृषिकेश येळगुडकर यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यार्थीदशेत या निवासी वर्गामुळे आपल्यावर झालेल्या वेगळ्या संस्कारातूनच आपला इथवरचा प्रवास झाल्याचे सांगून, तुम्हीही या वर्गातील सर्व विषयांच्या अध्यापनाचा व होणा-या संस्कारांचा लाभ घेऊन तुमचे आयुष्य घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
अभ्यागत सत्रात या वर्षी ६ नोव्हेंबरला आबलोली येथील प्रयोगशील युवा शेतकरी व हळदीच्या नव्या वाणाच्या संशोधन-निर्मितीसाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्री.सचिन कारेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सचिन कारेकर यांनी विद्यार्थ्यांना उच्च्य शिक्षण संपादन केल्यानंतर कोकणातच स्थिरावून आपल्या शिक्षणाचा उपयोग, आपण रुजलो त्या मातीसाठी, गावासाठी, कोकणासाठी करा अशी अनुभवी भूमिका मांडली. शेतीवर आधारित अनेक कृषिउद्योगांचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामध्ये करिअर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निवासी वर्गाच्या सांगता समारंभासाठी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थेतील शिक्षिका, उत्तम व्हायोलिन वादक, कलाकार आणि गुरु श्रीमती स्वप्ना दातार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षणाबरोबरच आयुष्यातील कलेचे महत्व त्यांनी विशद करुन आवडती कोणतीही कला जपा, जोपासा, वृध्दिंगत करा आणि त्यातून समृद्ध जीवनशैलीची आनंदानुभूती घ्या असे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. समारोप प्रसंगी सर्वश्री काटदरे सर, मुख्याध्यापक मिसाळ सर, शिक्षक प्रतिनिधी दीपक मराठे सर यांच्या जोडीने चार-पाच मुला मुलींनी या निवासी अभ्यासवर्गाबद्दलचे आपले अनुभव सांगणारे हृद्य मनोगत व्यक्त केले.
आपापल्या पाल्यांना परत घरी नेण्यासाठी उपस्थित असलेले बहुसंख्य पालक, वहाळमधील ग्रामस्थ, स्थानिक शिक्षक अशा अनेकांच्या उपस्थितीत आणि भावुक वातावरणांत, पार पडलेल्या निवासी अभ्यासवर्गाच्या हृदयंगम आठवणी घेऊन वर्गाच्या १७ व्या दिवशी सर्व मंडळी आपापल्या घरी परतली.