
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सुमारे ८० टक्के युवकांना लगतच्या गोवा राज्य रोजगार देत आहे आणि १०० टक्के आरोग्य सेवा देत आहे. या तालुक्यात जर रोजगार निर्माण झाले असते आणि आरोग्य सुविधा मिळाल्या असत्या तर "दोडामार्ग तालुका गोवा विलीनीकरण" या आंदोलनाचा विषय तालुक्यातील युवकांत निर्माण झाला नसता. या तालुक्यातील युवकांना आणि सर्वसामान्य जनतेला प्रत्येक निवडणुकीवेळी गाजर रुपी आश्वासन देण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप तालुका हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन अनेक वर्षे झाली. मात्र दोडामार्ग तालुका वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तालुके पर्यटन दृष्टीने विकसित झाली आहेत. या तालुक्या व्यतिरिक्त जिल्ह्यात इतर ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत आणि यातून मोठा रोजगार, आणि व्यवसायाची संधी स्थानिक जनतेला मिळाली आहे.
मात्र निसर्गरम्य तालुका असूनही, पर्यटनाला भरपूर वाव असूनही पर्यटन विकासापासून वंचित राहिला आहे. पर्यटनासाठी गेली अनेक वर्षे मोठ-मोठ्या घोषणा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात एकही रोजगार उपलब्ध केला गेला नाही. त्यामुळे केवळ दोडामार्ग वरच अन्याय का केला जात आहे? असा सवाल त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
आडाळी एमआयडीसी होऊन ११ वर्षे होत आली तरी अद्याप पर्यत एकही उद्योग त्या ठिकाणी उभारू शकले नाहीत. गेली १५ वर्षे रस्ते आणि इतर सुविधा निर्माण करण्यासाठी वेळ घालवत आहेत. या सुविधा लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून स्थानिक युवकांना आंदोलन करावे लागले. गोवा बांबोळी येथे पर राज्यातील जनतेला आरोग्य सेवा मोफत देणे बंद केले. प्रत्येक तपासणीला गोर गरीब जनतेला प्रत्येक वैद्यकीय तपासणीला पैसे मोजावे लागत होते. याची झळ दोडामार्ग तालुक्याला प्रामुख्याने जास्त बसत होती. कारण या तालुक्यात इतर तालुक्याप्रमाणे साधे उपचार घेण्यासाठी एकही हॉस्पिटल नव्हते. येथील ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही सुविधा आणि डॉक्टर नव्हते. त्यामुळे या तालुक्याला आरोग्याच्या दृष्टीने बांबोळी हा एकच आधार होता. सर्व सामान्य जनतेचे आरोग्य सुविधा अभावी होणारे हाल कोणत्याही राजकीय नेते मंडळींना दिसले नाही. आपल्या आरोग्याच्या न्याय हक्कासाठी सर्व सामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि त्यातून "आरोग्याचा जन आक्रोश" निर्माण झाला.
"आरोग्याचा जन आक्रोश" हे आंदोलन पहिले १९ दिवस सुरु राहिले होते. यात असंख्य तालुकावासिय सहभागी झाले होते. महिला वर्गाचा मोठा सहभाग या आंदोलनात होता. त्यावेळेच्या काही सत्ताधारी मंडळींनी या आंदोलनात फूट पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र तालुकावासियांना आपल्या आरोग्याच्या मागण्यांसाठी दोन वेळा आंदोलन करावे लागले व त्याचे फलित म्हणून आज बांबोळी मध्ये "महात्मा फुले आरोग्य योजना" सुरु करण्यात आली आणि आज दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाची जी २२ कोटींची इमारत बांधकाम सुरु आहे ते सर्व श्रेय "आरोग्याचा जन आक्रोश आंदोलनाचा आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय नेते मंडळींनी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला वैभव इनामदार यांनी दिला आहे.