
कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे दिवसाढवळ्या घरात घुसून वृद्धेचा गळा दाबून तिला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. महिलेने ओरडा केल्यानंतर तिच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन तिघे जण पसार झाले. या हल्ल्यात वृद्धा जखमी झाली. ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.
हरकुळ बुद्रुक जंगमवाडी येथे मालिनी श्याम पाटकर (वय ८६) या बंगल्यात एकट्याच राहतात. त्यांच्या दोन मुली मुंबईला वास्तव्याला असतात. मालिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास त्या हॉलमध्ये जपमाळ घेऊन जप करत बसल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती घरात आल्या. त्यांना खूणेने आपण कोण अशी विचारणा करताच, त्या दोघांनी मालिनी यांचा गळा आवळला. तसेच तोंडात कापडाचा बोळा कोंबून मालिनी यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांची माळ काढून घेतली. त्यानंतर हातामधील सोन्याच्या बांगड्या काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी संशयित दोघांची गळ्यावरील पकड सैल झाली. त्याचा फायदा घेऊन मालिनी यांनी तोंडातील बोळा काढून ओरडा केला. यात बंगल्याच्या वरच्या मजल्यावर राहणारी महिला तातडीने धावत खाली आली. तिने घरात शिरलेले दोघे चोरटे आणि जखमी झालेली वृद्धा पाहून जोरदार ओरडू लागली. त्यामुळे घरात शिरलेल्या दोघा संशयितांनी तसेच घराबाहेर असलेल्या तिसऱ्या संशयिताने देखील घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात धूम ठोकली.
दरम्यान, ओरडा झाल्यानंतर पळताना दोघा संशयितांनी गळा आवळण्यासाठी आणलेले कापड मालिनी पाटकर यांच्या कुंपणाच्या मागील बाजूला फेकून दिला. यावेळी पळताना दोघा संशयितांकडे असलेला एक मोठा सुरादेखील खाली पडला. त्या दोघांनी घराबाहेर काढलेल्या चपला देखील तशाच ठेवून पोबारा केला. घरापासून सुमारे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर उभ्या केलेल्या दुचाकीवरून तिघे फरार झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. वृद्धा आणि वरच्या मजल्यावर राहणारी दुसरी महिला यांच्या ओरड्यानंतर जंगमवाडीतील ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तसेच तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते तिघेही दुचाकीवरून हरकुळ बुद्रुक जंगमवाडी नागवे रस्त्यावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव आदींसह कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, कणकवली पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाने घरापासून कुंपणापर्यंत माग काढला होता.
दरम्यान, मागील चार पाच दिवस संशयित तिघांनी मालिनी पाटकर यांच्या घराची रेकी केली होती. घरात घुसून मालिनी यांचे दागिने लुबाडण्याबरोबरच तिजोरीही फोडण्याचा तिघांचा प्रयत्न असावा, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. मालिनी यांच्या तीव्र प्रतिकारामुळे तिघा संशयित चोरट्यांचा डाव फसला. मात्र, या घटनेत पाटकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सुमारे पावणे तीन लाख रुपयांची सोन्याची चैन लुटण्यात चोरटे यशस्वी झाले.