
राजापूर : राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात फिरणाऱ्या मोकाट गुरांवर आता गुरे तस्करी करणाऱ्या टोळक्याची वक्रदृष्टी पडली. रात्रीच्या वेळी ही गुरे वाहनांनमध्ये भरुन नेमकी कुठे घेवुन जातात हा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता या टोळक्याचा राजापूर पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधुन करण्यात येत आहे.
राजापूर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे रात्रंदिवस फिरत असतात तर आता भातकापणी झाल्यानंतर कोकणात गुरे न राखता जंगलात सोडुन देण्याची पध्दत पुर्वीपासुन आहे. त्यामुळे दिवाळीनंतर अनेक शेतकरी आपली गुरे चरण्यासाठी जंगल भागात सोडून येतात. आता याचाच फायदा घेत राजापूर शहर परिसरातील काही तरुणानी या गुरांना रात्री उशीरा पकडुन गाडीत भरुन त्यांची वाहतुक करण्याचा सपाटा चालवला आहे. राज्यात सध्या पोलिस दल निवडणुकीच्या बंदोबस्तात असताना अशा घटनांना पेव फुटले आहे .
तालुक्याच्या ग्रामिण भागातील अनेक शेतकऱ्यांची गुरे अचानक गायब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . तालुक्याच्या ग्रामिण भागात जागोजागी असणारा बिबट्याचा वावर पाहता प्रथम काही शेतकऱ्यांना आपली जनावरे बिबट्याच्या भक्षस्थानी पडल्याची शंका होती मात्र काही शेतकऱ्यांनी या टोळक्याला गुरे पकडुन वाहनांमधुन वाहतुक करताना पाहिल्याने आता सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
राजापूर शहरातही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा मुक्त वावर वाढला असुन नेमकी हीच संधी या तस्करांनी साधली आहे . रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेवुन मुक्त फिरणाऱ्या जनावराना पकडुन त्यांची वाहतुक करण्याचा त्यांनी चालवलेला सपाटा कारवाई करुन त्वरीत थांबवण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे .
गुरुवार आठवडा बाजाराच्या दिवशी संध्याकाळी ही मोकाट गुरे शहर परिसरात व आठवडा बाजार परिसरात मुक्तपणे फिरत असतात . त्याचा फायदा घेत आता या तस्करी करणाऱ्या टोळक्याने रात्री उशीरा शहरात फिरत शहरातील सगळी गुरे हाकलत एकत्र आणुन त्यांना गाडीत भरण्याचा व वाहतुक करण्याचा चालवलेला सपाटा पाहुन राजापूर वासियांमधुन संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या गुरांची तस्करी करणाऱ्या टोळक्याचा लागलीच बंदोबस्त करावा अशी मागणी राजापूर तालुकावासियांमधुन करण्यात येत आहे.