
सावंतवाडी : वन विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांने शेतकरी व लाकुड व्यावसायिक यांना वेठीस धरले आहे. त्याच्या तक्रारीवरून कारवाईचा आदेश देताना आम्हाला विश्वासात घ्या, आम्ही याबाबत जाब विचारू, वन विभागाच्या नियमांचा बागुलबुवा दाखवून निवृत्तीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, लाकुड व्यावसायिकांना त्रास देण्याचे थांबले नाही,तर आम्हाला एकजूट दाखवावी लागेल असा इशारा उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याशी चर्चा करताना देण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड उपस्थित होते.
सिंधुदुर्ग वन विभाग कार्यालयात उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांची भेट शेतकरी व लाकुड व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. आज सुमारे दोनशे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लाकुड व्यावसायिक बाळा भिसे, शिवाजी गवस, संदीप सुकी, नितीन दळवी, शकील शेख, लक्ष्मण गावडे, संजय राऊळ, अजय निंबाळकर, दीपक इस्वलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी म्हणाले, या पुर्वी न्यायालयात प्रकरण दाखल झाले तो नियम लागू आहे. जमीन वाद निर्माण झाल्यास तक्रार होते.आपले सरकार पोर्टल मध्ये तक्रार होते. कुटुंबातील वाद निर्माण झाल्यास कारवाई करावी लागते. या दरम्यान परवानगी देणारा अधिकारी अडचणी मध्ये येतो. छोटे छोटे वाद तक्रारीचे कारण ठरत असेल तर नियमानुसार कारवाई केली जाईल. दोडामार्ग तालुक्याची इको सेन्सिटिव्ह झोन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथे नियमानुसार कारवाई करावी लागते.
सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड म्हणाले, धोरणात्मक निर्णय झाला आहे त्यामुळे आम्हाला काही निर्णय घेता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुडफेथ निर्णय घेता येत नाही.
बाळा भिसे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाकुड व्यवसाय सुरू आहे. नियम आणि व्यवहार सांगड घालून व्यवसाय व्हायला पाहिजे. ऑनलाईन सातबारा झाला आहे. त्यामुळे भोगवटदार दाखला नको. स्वतः चे झाड तोडताना हमीपत्र घेऊन परवानगी मिळाली पाहिजे. लाकुड कोल्हापूर, गोवा, बेळगाव मध्ये विकले जाते. पास कामानंतर मुदतवाढ वनक्षेत्रपाल पातळीवर मिळावी. मालकीचे काम वनपाल पातळीवर व्हावे. नवीन नियमानुसार अंमलबजावणी झाली तर शेतकरी,व्यवसायीक आर्थिक अडचणीत सापडतील. न्यायालयात धाव घेतली आहे. कुटुंबातील वाद झाल्यानंतर हमीपत्र घेऊन परवानगी दिली पाहिजे.वन विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्राला किंवा तक्रारीला फारच महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे त्रास दिला जात आहे. शेतकरी व व्यावसायिक लोकांना त्रास देत आहेत. सेवेत नसताना संघटनेचा पदाधिकारी कसा?
त्यांच्या तक्रारीनुसार कारवाई नको. सेवा निवृत्तीनंतर शेतकरी व लाकुड व्यावसायिक यांना वेठीस धरण्याचा संबंधितांचा उद्देश काय आहे. हे आम्हाला समजले आहे. त्यामुळे वन विभागाने दखल घेऊन कारवाई करू नये, जरूर तर आम्हाला आणि त्यांना एकत्रित बसवून एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका असे लाकुड व्यावसायिकांनी सांगितले. उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी म्हणाले, आम्हाला कायदा व नियमानुसार कारवाई करावी लागते. त्यामुळे धोरणात्मक निर्णयावर आम्ही काही बोलणार नाही.