सिंधुरत्न योजनेत गैरव्यवहार ? ; ठाकरे शिवसेनेचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2024 15:06 PM
views 252  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सिंधुरत्न योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यामध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मरशी संबंधित कामांमध्ये निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी निधीचा मनमानी पद्धतीने वापर केला असून त्याचे सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक किंवा व्यावसायिक हित साधण्यासाठी गैरवापर केल्याचे आरोप केला आहे.  विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या मंजुरी प्रक्रियेतील अपारदर्शकता आणि काही खास व्यक्तींना लाभ देण्यासाठी निधीचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. योजनेच्या संपूर्ण खर्चावर आणि मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निकषांवर लक्ष ठेवून चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी  जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर उपस्थित होते.