
कुडाळ : सिंधुरत्न समृध्द योजना सन 2024-25 अंतर्गत कुडाळ तालुक्यात 1,379 शेतकर्यांनी ताडपत्रीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. या सर्व शेतकरी अर्जदारांच्या लॉटरी सोडत पध्दतीने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामधील मंजुर 722 शेतकर्यांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत 657 शेतकरी ताडपत्रीच्या प्रतिक्षेत असुन शासनाकडून अनुदान उपलब्ध होताच या सर्व शेतकर्यांना प्राधान्याने ताडपत्री वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कुडाळ येथील तहसिल विभागाच्या समोरील कृषी कार्यालयात कुडाळ तालुका कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉटरी सोडत पध्दतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुडाळ मंडळ कृषी अधिकारी विजय घोंगे कडावल मंडळ अधिकारी रविंद्र कोळी, माणगाव मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली आदिसह कृषी सेवक, कर्मचारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यात जवळपास 13 हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाचे आहे. त्यामुळे या उन्हाळी मौसमात शेतकर्यांना ताडपत्रीची गरज ओळखून कृषी विभागाच्या वतीने सिंधुरत्न योजनेतून निधीची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनूसार शासनाने सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून 2 हजार रूपये ताडपत्रीसाठी निधी मंजुर केला. यामध्ये लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देवून 2 हजार रूपयाची ताडपत्री शेतकर्यांना केवळ 500 रूपयात उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले. त्यासाठी महिन्याभरापूर्वी शेतकर्यांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले. कृषी विभागाच्या आवाहनानुसार कुडाळ तालुक्यातून 1 हजार 379 अर्ज दाखल झाले होते. त्या सर्व अर्जाची लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली. यामध्ये मंजुर असलेल्या 722 लाभार्थी शेतकर्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. उर्वरीत 657 शेतकर्यांना शासनाकडून निधी उपलब्ध होताच तात्काळ ताडपत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहिले होते.










