२५ वर्षांनी महायुतीनं प्रश्न सोडवला !

गावासाठी झटणारे संदीप गावडेंसारखे कार्यकर्ते तयार व्हावेत : रविंद्र चव्हाण
Edited by: विनायक गांवस
Published on: October 09, 2024 10:16 AM
views 283  views

सावंतवाडी : वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे सदैव महायुतीच्या पाठीशी ठेवा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमीनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटपाचा कार्यक्रम सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.


ते म्हणाले, आंबोली चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. 

महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील हे महायुती सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे. त्यामुळेच हे काम होऊ शकलं. कोकणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील होत. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व योजना बंद करण्याचे आपल्या काळात केलं होतं. या सर्व योजना सुरू करण्याच काम महायुतीने केल हे ध्यानात ठेवावे लागेल. यासाठीच सर्वांनी माहिती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

 

दरम्यान, गेळे येथील जमीन वाटपाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी संदीप गावडे हा कार्यकर्ता माझ्या दिवसरात्र सातत्याने मागे लागला होता. या जमीन वाटपा संदर्भात अभ्यासपूर्णरित्या माहिती गोळा करून ती प्रशासनाकडे सादर करून त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याचे काम संदीप गावडे यांनी केले. प्रसंगी उपोषणासारखा मार्गही स्वीकारला. गावासाठी झटणारे असे युवक गावागावात तयार झाले पाहिजेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.