
वेंगुर्ला: येथील निवती समुद्रात मच्छीमारी करणारी नौका बुडून दोन खलाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज ५ ऑक्टोबर मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली. या मच्छीमारी नौकेत एकूण १४ खलाशी होते. यातील खवणे येथील रघुनाथ धर्माजी येरागी (४९) व श्रीरामवाडी येथील आनंद पुंडलिक पराडकर (५२) या २ मच्छिमारांचा मृत्यू झाल्याची माहिती निवती पोलिसांनी दिली आहे.
४ ऑक्टोबर रोजी रात्री मच्छिमारीसाठी ही नौका गेली होती. मच्छिमारी करून किनाऱ्याच्या दिशेने परतत असताना नौकेचे इंजिन बंद पडून लाटेच्या धक्क्याने अचानक नौका पलटी झाली. त्यातील १४ ही खलाशी समुद्रात फेकले गेले. यातील १२ खलाशी बचावले मात्र दोन खलाशांचा बुडून मृत्यू झाला. त्यातील एकाचा मासे मारण्याच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला तर एकाचा समुद्रातून बाहेर काढताना मृत्यू झाला. यावेळी निवती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्काळ निवती येथे धाव घेत मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या तर्फे तात्काळ स्वरूपाची आर्थिक मदत केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, विभागप्रमुख देवदत्त साळगावकर उपस्थित होते.