वेंगुर्ला नगरपरिषदेच्या “स्वच्छता ही सेवा” पंधरवड्याचा समारोप

Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2024 11:45 AM
views 109  views

वेंगुर्ला :   “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) हे अभियान देशभरात दि. १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महात्‍मा गांधी व लालबहादूर शास्‍त्री यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी दाभोली नाका ते निमसुगा या परिसरात वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले.  

दाभोली नाका ते निमसुगा हा परिसर वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीवर येत असल्‍याने शहराबाहेरील लोकांकडून या ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्‍यामुळे या  परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. स्‍वच्‍छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला या ब्रीदवाक्‍याला अनुसरुन या परिसरातील प्‍लॅस्टीक पॅकेट्स व पिशव्‍या, प्‍लॅस्‍टीक बॉटल्स, काचेच्‍या बॉटल व फुटलेल्‍या काचा, कागद व पुठ्ठे व इतर घातक कचरा अशा प्रकारचा विलगीकृत कचरा संकलन करून परिसराची साफसफाई करण्‍यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत अंदाजे १.५ टन एवढा कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला.  

        या स्वच्छता मोहीमेमध्‍ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, जिल्‍हा नियोजन सदस्‍य दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे आदी मान्‍यवर तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी/कर्मचारी, डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे  सदस्‍य, माझा वेंगुर्लाचे सदस्‍य व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक सहभागी झाले होते. 

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरातील महत्‍वाच्या ठिकाणी व पर्यटन स्‍थळी  नियमितपणे अशा प्रकारची  स्वच्‍छता मोहीम राबविले जाते. स्वच्छता अभियानाचे मुख्‍य उद्दिष्ट लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक करणे, आपल्या परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे, कचरा व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढवणे हे असून वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या स्वच्छतेच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवा आणि आपल्या परिसराला स्वच्छ बनवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्‍यक्‍त केले तसेच दाभोली नाका ते निमसुगा परिसरात स्‍वच्‍छता अभियान राबवून “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) पंधरवाड्याचा समारोप करण्‍यात आला.